पाकिस्‍तानच्‍या क्रिकेटपटूंनी 'फडकावला' पॅलेस्‍टाईनचा झेंडा!, 'या' खेळाडूंची पोस्‍ट चर्चेत | पुढारी

पाकिस्‍तानच्‍या क्रिकेटपटूंनी 'फडकावला' पॅलेस्‍टाईनचा झेंडा!, 'या' खेळाडूंची पोस्‍ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धा सुरु असताना पाकिस्तानचे खेळाडू पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. शुक्रवार, २० ऑक्‍टोबर रोजी बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. या सामन्यावेळी प्रेक्षक इस्रायल किंवा पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कोणतेही पोस्टर किंवा प्लेकार्ड मैदानावर आणणार नाहीत, अशी आयसीसी आणि आयोजकांकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्‍यात आली आहेत. मात्र या सामन्‍यापूर्वी अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी पॅलेस्‍टाईनचे समर्थन करत सोशल मीडियावर पॅलेस्‍टाईनचा झेंडा फडकावला आहे. त्‍यांनी केलेल्‍या पोस्‍ट चर्चेचा विषय ठरल्‍या आहेत. ( Israel-Hamas War)

‘या’ पाकिस्तानी खेळाडूंनी पॅलेस्टाईनला दिला पाठिंबा

पाकिस्तानचा उपकर्णधार शादाब खान, हारिस रौफ, मोहम्मद नवाज, सलमान आगा आणि इफ्तिखार अहमद यांसारख्या मोठ्या खेळाडूंनी पॅलेस्टाईनच्या ध्वजाचा फोटो X (पूर्वीचे ट्विटर) तसेच इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानच्या विश्वचषक संघातून बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमनेही पॅलेस्टाईनचा ध्वज शेअर केला आहे. पाकिस्तान संघातून बाहेर असलेला वेगवान गोलंदाज फहीम अश्रफ, निवृत्त क्रिकेटपटू अझर अली आणि नवोदीत उसामा मीर यांनीही साेशल मीडियावरील आपल्‍या पाेस्‍टच्‍या माध्‍यमातून पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावला आहे.

रिझवाननेही दर्शविला हाेता गाझाला पाठिंबा

यापूर्वी पाकिस्‍तानचा क्रिकेटपटू मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा विजय आणि आपले शतक गाझाला समर्पित केले होते. रिझवानने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. त्याने १३१ धावांची नाबाद खेळी खेळली केली होती. या खेळीनंतर, रिझवानने X (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं होतं की, “हा विजय गाझामधील आमच्या बंधू-भगिनींसाठी आहे. विजयात योगदान दिल्याबद्दल आनंद झाला”.

इस्रायल-पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजीवर बंदी

विश्वचषकातील काही सामन्‍यात इस्त्रायल-हमास युद्धाशी संबंधित फलक आणि पोस्टर्स काहीवेळा मैदानावर झळकली गेली. आता यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ फलकच नाही तर आता इस्रायल किंवा पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजीवर बंदी घालण्यात आली आहे.

Back to top button