प्रशांत किशोर : ‘मोदी जातील, पण भाजप राहील, राहुल गांधी यांच्यावर टीका करताना भाकित | पुढारी

प्रशांत किशोर : 'मोदी जातील, पण भाजप राहील, राहुल गांधी यांच्यावर टीका करताना भाकित

नवी दिल्ली, नवी दिल्ली

मोदी जातील पण भाजप कायम राहील, असे सांगत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

राहुल गांधींना वाटते की जनता नरेंद्र मोदींची सत्ता घालवेल आणि काँग्रेसला संधी मिळेल. पण जो पक्ष राष्ट्रीय पातळीवर ३० टक्के मते घेतो तो कधीच हटत नाही, हे राहुल गांधी यांना समजत नाही, अशी टीका निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केली.

किशोर यांनी ‘भाजप कित्येक दशके हलणार नाही’ असे सांगत काँग्रेस बेभरवशी राजकारण करत असल्याची अप्रत्यक्ष टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सहभागी होणार होते. मात्र, संघटनेत किशोर यांना महत्त्वाचे स्थान हवे होते. मध्यंतरी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी पक्षात प्रवेश केला. यामागे प्रशांत किशोर असल्याचे मानले जात होते. प्रशांत किशोर यांचाही पक्षप्रवेश लवकर होईल असे मानले जात होते मात्र, तो होऊ शकला नाही. त्यात गोवा येथे एका मुलाखतीत भारतीय राजकारणावर भाष्य करताना राहुल गांधींवर टीका केल्याने पक्षप्रवेशाच्या अंदाजांना पूर्णविराम दिला आहे.

किशोर म्हणाले, ‘ भाजप भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू होत आहे. यापुढे भलेही ते जिंकू देत अथवा पराभव पत्करू देत. ज्याप्रमाणे काँग्रेस स्वातंत्र्यानंतर पुढील ४० वर्षांत होती तसेच आता भाजप आहे. भाजप कुठेही जाणार नाही. तुम्ही एकदा राष्ट्रीय पातळीवर ३० टक्के मते घेतली की तुम्ही इतक्या लवकर जात नाही. त्यामुळे तुम्ही अशा भ्रमात राहू नका की, लोक नाराज होतील आणि मोदींना हटवतील. असेही होईल की लोक मोदींना हटवतील पण भाजप कुठेही जाणार नाही. पुढील काही दशके भाजपचा प्रभाव राहील.

राहुल गांधी भ्रमात

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती, त्यावर बोलताना ते म्हणाले, खरी समस्या राहुल गांधी आहेत. लोक नरेंद्र मोदी यांना उखडून फेकतील असे त्यांना वाटते. ते विचार करतात की, काही दिवसांची गोष्ट आहे. लोक त्यांना हाकलून लावणार. मात्र, हे होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींचा ताकद समजू शकत नाही. तोपर्यंत तुम्ही त्यांना काऊंटर करू शकत नाही. तुम्ही त्यांना कधीच पराजित करू शकत नाही.

लखीमपूर खिरीमुळे पक्षाला काहीच फायदा नाही

काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी म्हटले होते की, काँग्रेसमध्ये खूप गुंतागुंत आहे आणि लखीमपूर खिरी प्रकरणामुळे पक्ष पुनर्जिवित होणार नाही. लखीमपूर खिरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात जुना पक्ष विरोधकाच्या भूमिकेत त्वरित उभा राहणे हा लोकांचा अपेक्षाभंग ठरू शकतो. दुर्दैवाने सर्वात जुना पक्ष गेल्या अनेक अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या समस्यांवर तातडीने कुठलाच उपाय शोधणार नाही.’ असे म्हटले होते.

हेही वाचा : 

Back to top button