Gary Kirsten : गुरू गॅरी कर्स्टन पाकिस्तानचे नवे कोच होण्याची शक्यता | पुढारी

Gary Kirsten : गुरू गॅरी कर्स्टन पाकिस्तानचे नवे कोच होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) पाकिस्तानचे नवे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. कर्स्टनने याआधी आपल्या कोचिंगमध्ये टीम इंडियाला (Team India) वर्ल्ड चॅम्पियन बनवले आहे. गॅरी कर्स्टन यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सायमन कॅटिच आणि पीटर मूर्स हेही पाकिस्तानचे प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आहेत.

मिसबाहने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता…

टी २० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या दोघांनी पायउतार झाल्यानंतर, माजी ऑफस्पिनर सकलेन मुश्ताक यांना पाकिस्तान राष्ट्रीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक आणि माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्र, त्यांचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतरच संपणार आहे.

कर्स्टनने त्यांच्या कोचिंगमध्ये भारताला विश्वचषक जिंकून दिला…

गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) २००८ ते २०११ या काळात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय क्रिकेट संघाने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. कर्स्टन यांच्याच कोचिंगमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली.

सायमन कॅटिचबद्दल सांगायचे तर, त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चे सहाय्यक प्रशिक्षक आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. पीटर मूर्स हे दोन वेळा इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत. तसेच, मूर्स हे दोन वेगवेगळ्या संघांसह काउंटी चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या मोजक्या प्रशिक्षकांपैकी एक आहेत.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींचा कार्यकाळ टी २० वर्ल्ड कपनंतर संपणार…

टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी २० वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा कोच कोण होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. टी २० वर्ल्ड कपनंतर भारतीय टीम लगेच न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कोच होणार अशी चर्चा आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता आहे. नव्या कोचच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. त्यामुळे दरम्यानच्या काळात अनुभवी द्रविडकडं ही जबाबदारी सोपवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

Back to top button