

अखेर ड्रग्ज प्रकरणी उच्च न्यायालयाने आज आर्यन खानला जामीन मंजूर केला. त्याचबराेबर अरबाज मर्जंट आणि मूनमून धमेचा यांनाही जामीन मंजूर करण्यात आले आहे. ( Aryan Khan's bail hearing ) मागील तीन दिवस आर्यन खानसह अन्य आराेपींच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, निकालाची प्रत उद्या मिळणार असल्याने आर्यन खान उद्या शुक्रवारी आर्थर रोड कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणी गेली २५ दिवस ताे कारागृहात हाेता.
आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी एनसीबीच्या वतीने युक्तीवाद करताना अतिरिक्त सॉलिसिएर जनरल ( एएजी) अनिल सिंग म्हणाले की, आर्यन खान मागील दोन वर्षापासून तो नियमित ड्रग्जचे व्यसन करत आहे. मागील दोन वर्षांमध्ये त्याने मोठ्य्या प्रमाणावर ड्रग्ज विकत घेतले आहे. तो ड्रग्ज सेवनाबरोबरच त्याची विक्रीही करत होता. ड्रग्ज रॅकेटचा तो भाग आहे, असे सांगत त्याला जामीन देण्यात येवू नये, अशी मागणी
त्यांनी केली.
अनिल सिंह म्हणाले की, क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील छापा टाकला तेव्हा अरबाज मर्चंट यालाही अटक करण्यात आली. तो आर्यनचा बालमित्र आहे. ते क्रूझवर एकाच खोलीत राहणार होते. त्यांना टर्मिनलवरच पकडण्यात आले. आर्यनची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली नाही, असा युक्तीवाद करण्यात आला आहे. आम्हीही त्याने ड्रग्जचे सेवन केले, असे म्हटलेले नाही. अंमली पदार्थ विरोधी कायदा ( एनडीपीएस ) कायद्याच्या कलम २८ व ८ सी नुसार त्याने ड्रग्जचे सेवन केले नसले तरी ते बाळगले कलम लागू होते. तसेच कटकारस्थानचा प्रकार असल्याचे कलम ३७ लागू होते. हा गंभीर गुन्हा आहे. याप्रकरणी आर्यन खान हा अंमली पदार्थाचा व्यापार करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होतेय, असेही त्यांनी न्यायालयास सांगितले.
ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला २ ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आले. यानंतर ८ ऑक्टोबर रोजी त्याची रवानगी मुंबईतील आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. मंगळवारी ( दि. २६) आर्यनच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये म्हटलं आहे की, आर्यन खान याचा प्रभाकर साईल आणि किरण गोसावी यांच्याशी ओळख नाही. तसेच ड्रग्ज प्रकरणातील पैशाच्या देवाणघेवाणामध्ये झालेल्या आरोपांशी आर्यन खान याचा कोणताही संबंध नाही, असेही यामध्ये नमूद केले होते.
मंगळवारी ( दि. २६ ) झालेल्या सुनावणीवेळी माजी ॲटर्नी जनरल आणि विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी आर्यनसाठी युक्तीवाद केला. आर्यन खान याला या पार्टी आमंत्रण होते. त्याने क्रूझने गोव्याला जाण्यासाठी तिकिटही काढले नव्हते. आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडलेले नाही; मग त्याला अटक कशी केली? असा सवाल करत एनसीबीच्या अधिकार्यांनी अधिकाराचा गैरवापर करत आर्यन खान याला अटक केली, असेही त्यांनी सांगितले.अरबाझ मर्चंट याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्ज सापडले. आर्यन खानचा ड्रग्जशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्याची वैद्यकीय चाचणी देखील घेतली गेली नाही. आर्यन खानला टार्गेट केले जातंय, असेही रोहतगी म्हणाले होते.