वणीत महिलेला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार; चौघे नराधम चार तासात गजाआड - पुढारी

वणीत महिलेला उचलून नेऊन सामूहिक बलात्कार; चौघे नराधम चार तासात गजाआड

अनिल गांगुर्डे; पुढारी वृत्तसेवा

४५ वर्षांची एक महिला रात्री बसस्थानकावर फोनवर बोलत होती. आपल्याबद्दल काही वाईट घडेल असे तिच्या ध्यानीमनीही नव्हते. फोनवर तिचं संभाषण सुरू असताना अचानक आलेल्या चार तरुणांनी तिला जबरदस्तीने उचलून नेत सामूहिक बलात्कार केला. पण पोलिसांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे चारही नराधम अवघ्या चार तासांत गजाआड पोहोचले आहेत.

या घटनेने वणी परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील चारही संशयित युवकांना पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांची नावे सोमनाथ कैलास गायकवाड (वय २३) संदिप अशोक पीठे (वय २४), राजेंद्र दिपक गांगोडे (वय २६), आकाश शंकर सिंग (वय २४) सर्व राहणार इंदिरानगर, वणी अशी आहेत.

पीडित महिला रात्री साडे अकराच्या सुमारात बसस्थानक परिसरात फोनवर एक व्यक्तीशी बोलत होती. त्यावेळी अचानक आलेल्या ४ युवकांनी या महिलेला उचलून नदीकडेला नेले. तेथे सुरुवातीला दोघांनी या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर अन्य २ युवकांनी या महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर चौघे तरुण पसार झाले.

पीडित महिलेने ओळखीतील व्यक्तीला घडला प्रकार फोनवरून कळवला. संबंधित व्यक्तीने हा प्रकार वणी पोलिसांना कळवला.

सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी सहकाऱ्यासमवेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

आणि पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली

संशयित घटनास्थळी दुचाकी टाकून गेले होते. त्यामुळे ही दुचाकी घेण्यासाठी संशयित येतील असा अंदाज राजपूत यांना होता. त्यानुसार त्यांनी घटनास्थळीच सापळा रचला. काही वेळात काही संशयित दुचाकी घेण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. पोलीस स्टेसनला नेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सर्व संशयितांना पोलीस कोठडी मिळाली असून पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

तपास पथक : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगने व उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी करुन तपास पथकास मार्गदर्शक केले. वस्वप्निल राजपूत, पोलीस उपनिरीक्षक रतन पगार, पो.कर्मचारी बच्छाव, आण्णा जाधव, किरण धुळे,प्रदीप शिंदे यांनी तपास केला.

हे ही वाचलं का?

Back to top button