रेल्वेच्या आशिर्वादाने अनधिकृत स्टॉल्स - पुढारी

रेल्वेच्या आशिर्वादाने अनधिकृत स्टॉल्स

पुणे : प्रसाद जगताप : रेल्वेस्थानक परिसरातील वाढती अडगळ… प्रवाशांना परिसरात बसायला झालेली जागेची कमतरता… उघड्यावरच्या अन्नामुळे निर्माण झालेला आरोग्याचा धोका… सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा आणि विनामास्क फिरणारे लोक ही परिस्थिती आहे पुणे रेल्वेस्थानक परिसराची. त्यात अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या स्टॉलची भर पडल्याने परिसराला अधिकच बकालपण आले आहे. पुणे स्टेशन परिसरात 100 मीटर अंतराच्या आत खानपान स्टॉल वा खाद्यपदार्थांच्या गाड्या उभारता येत नाहीत. मात्र, नियमभंग करीत इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (आयआरएसडीसी) च्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वेस्थानक परिसरात 8 खानपान स्टॉल, 1 खाद्यपदार्थांची गाडी उभी केल्याचे दै.‘पुढारी’च्या पाहणीतून आढळून आले.

या अनधिकृत स्टॉलमुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका आणि प्रवाशांना उठण्या-बसण्यासाठीच्या जागेची कमी असल्याचे दिसले आहे.सणासुदीच्या काळात पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना उभे राहायला जागा नसते. त्यातच रेल्वेने येथे अनधिकृत स्टॉल उभारून जागाच अडविली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

अजित पवारांच्या मामेभावाच्या घरावर ईडीचा छापा

इमारतीच्या रचनेत बदल आणि फ्लेक्सबाजी

खूपच जुन्या असलेल्या रेल्वे स्थानकाच्या इमारतीला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या इमारतीच्या परिसरात इतर काहीही करण्यास बंदी आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने या इमारतीमध्ये केलेल्या काही बदलांमुळे इमारतीचे ऐतिहासिक महत्त्वच गेले आहे. परिसरात रेल्वेने खाद्य पदार्थांचे स्टॉल्स उभारले आहेत. तसेच, जाहिरातबाजीसाठी परिसरात अनेक ठिकाणी मोठ-मोठे फ्लेस लावले आहेत. त्यामुळे इमारतीची शोभाच गेली आहे.

महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण अडचणीत?

स्टॉलवर गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रेल्वे स्टेशनच्या समोर उभारण्यात आलेल्या फूड स्टॉलवर प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे येथे पूर्णत: सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तसेच, येथे एकाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क लावल्याचे पाहायला मिळत नाही. खाद्यपदार्थ विक्रेत्याच्या तोंडावरही मास्क पाहायला मिळत नाही. सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथून नक्कीच कोरोनाचा प्रसार वाढणार आहे.

म्हणून बिबट्याने अन्नाविना घालवला पाण्यावरच दिवस

“पुणे रेल्वेस्थानकाची इमारत ही ऐतिहासिक आहे. येथे आगामी काळात जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बनविण्याचे नियोजन आहे. अशा प्रकारचे स्टॉल काही वर्षांच्या करारासाठी सुरू केले, तर स्थानकाचा विकास कसा होणार? तसेच, रेल्वेस्थानकाच्या परिसरात 100 मीटर अंतरापर्यंत रेल्वेला काहीही करता येत नाही. त्याचबरोबर रेल्वे स्थानकाच्या बाहेर खानपान सुविधा देण्याचा रेल्वेला अधिकारच नाही. असे असतानाही हे स्टॉल उभे राहिले कसे? हा मोठा प्रश्न आहे. रेल्वेचे अधिकारी सरळ-सरळ लपून-छपून गैरकारभार करीत आहेत.”
– हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

“रेल्वेस्थानक परिसरात बनविलेले स्टॉल ‘आयआरएसडीसी’ने बनविलेले आहेत. ते अधिकृत आहेत. मुंबईतसुद्धा छत्रपती शिवाजी टर्मिनलच्या ऐतिहासिक इमारतीबाहेर असे स्टॉल पाहायला मिळतात. हे प्रवाशांच्या खानपान सुविधेसाठी आहेत. मात्र, रेल्वे बोर्डाने आता आयआरडीसीचे काम कायमचे बंद केले आहे. त्यासंदर्भातील आदेश निघाले आहेत. लवकरच हे बंद करण्यात येणार असून, रेल्वेला त्यांचे सर्व काम हस्तांतरित करण्यात येणार आहे.”
– मनोज झंवर,
जनसंपर्क अधिकारी, रेल्वे पुणे विभाग

Back to top button