मगर सगळ्यांनाच आवडते. पण ती फक्त लांबून पाहण्यासाठी. मगरीला जवळ जावून कोणच पाहू शकत नाही. मगर अचानक हल्ला करते. त्यामुळे मगरीची भीती सगळ्यांनाच आहे. पण एका मंदिरातील असे एक पुजारी आहेत, त्यांची आणि मगरींची मैत्री आहे. त्या पुजाऱ्यांच नाव सीताराम दास आहे.
छत्तीसगडच्या कोटमी सोनारमध्ये एक तलाव आहे. सीताराम दास याच तलावाजवळ नेहमी असतात. या तलावात अनेक मगरी आहेत. दास यांना मगरी आवडतात. ते मगरींना स्वतःची मुले मानतात.
आश्चर्य म्हणजे या मगरी दास यांचा आवाज आणि त्यांचे इशारे ओळखतात. १५ वर्षापूर्वी सीताराम दास मगरीने केलेल्या हल्ल्याचे शिकार झाले होते. या हल्ल्यात त्यांनी एक हात गमावला आहे. हे घडूनही त्यांनी कधी मगरींचा द्वेष केलेला नाही.
मगर आजही सीताराम दास यांचा आवाज ऐकून पाण्यातून बाहेर येतात. पुजारी या मगरींना त्यांच्या दिसण्यावरून ओळखतात. 'मगर मला इजा करणार नव्हती. मी तिच्या मार्गात आलो म्हणून त्या मगरीने मला पकडले. यानंतर तिने मला जाऊ दिले.' अस दास यांनी म्हटले आहे.
दास ५० वर्षापूर्वी गोरखपूरमधून या गावात आले होते. ते गाईंचा सांभाळ करतात. ते हळूहळू तलावातील मगरींकडे आकर्षित झाले. त्यांनी मगरींसाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यातील जास्त काळ मगरींची सेवा करण्यात गेला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह या तलावात टाकावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.