खानापूर ; पुढारी वृत्तसेवा : दांडेली येथील काळी नदीच्या काठावर मासेमारी करणार्या मुलावर मगरीने हल्ला करून पाण्यात ओढून नेल्याची घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. मोसिन महमदअली गुलबर्गा (वय 15, रा. अलाईड वसाहत, दांडेली) असे मगरीच्या हल्ल्यात बळी पडलेल्या बालकाचे नाव आहे.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात एनडीआरएफ पथक, पोलिस, वनविभाग आणि गणेशगुडी राफ्टिंग टीमने शोधकार्य राबविले; पण मृतदेह सापडला नाही.
सुट्टीमुळे मोसीन दांडेली शहरातील हल्याळ रोडपासून काही अंतरावर असलेल्या विनायक नगर येथील काळी नदीकाठावर मासेमारी करण्यासाठी गेला होता. काठावर बसून गळ टाकून मासेमारी करताना अचानक मगरीने त्याच्यावर हल्ला चढविला. पाण्यात वाकलेला असताना त्याचे डोके तोंडात धरून मगरीने पाण्यात डुबकी मारली. दोनवेळा पाण्याबाहेर वर-खाली करून तिसर्या वेळी मुलासह मगर पाण्यात गडप झाली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
याबाबत नागरिकांकडून माहिती मिळताच नगराध्यक्षा सरस्वती रजपूत यांनी पोलिसांना कळविले. पोलिस निरीक्षक प्रभू गंगणहळ्ळी, उपनिरीक्षक आय आर गड्डेकर, एसीएफ एस एस निंगाणी, दांडेलीचे आरएफओ बसवराज, विरनोळीचे आरएफओ विनय भट यांनी घटनास्थळी भेट दिली. गणेशगुडी राफ्टींग टीमच्या युवकांना पाचारण करून शोध मोहीम सुरू केली. पण यश आले नाही. सोमवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली.
एनडीआरएफ पथकाचीही मदत घेण्यात आली. पण मगर एक सारखी पाण्यात फेरी मारत असल्याने शोधकार्यात अडथळा येत आहे. आता मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती एसीएफ एस. एस. निंगाणी यांनी 'दै पुढारीशी' बोलताना दिली.