'माझी वर्दी राष्ट्रपतींनी दिलेली असून ती कुणालाही उतरवणे शक्य असेल तर त्यांना शुभेच्छा !' अशा शब्दात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे ( NCB ) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांनी आपल्यावरील टिकाकारांना आव्हान दिले आहे. मुळात खंडणी हा खूप वाईट शब्द आहे. आपण आपातर्यंत दुबईला कधीच गेलेलो नाही. त्यामुळे आपल्यावर होणार्या आरोपात काहीच तथ्य नाही, असे स्पष्टिकरणही त्यांनी दिले आहे.
समीर वानखेडेंवर सध्या सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब यांनी तर वानखेडेंना वर्षभरात त्यांची नोकरी जाईल, अशी धमकीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, शाहरुखचा मुलगा आर्यन खान प्रकरणापासून यापूर्वी दाऊदच्या भावावर केलेली कारवाई, अशा अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
मालदीवला मुलांसह कौटुंबिक सहलीवर गेलो होतो. ते देखील नियमांनुसार वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेऊन. तो काही गुन्हा ठरतो का ? स्वत:च्या पैशाने, विमानातून सर्वसाधारण वर्गाने प्रवास केला. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये कसा परदेश प्रवास करणार, हे तरी सांगा. एवढ्या मोठ्या मंत्र्याने विचार करून आरोप करावेत. अधिकारी आहे म्हणजे तो भ्रष्टाचारीच असणार, असा एकच विचार त्यांना सुचतो का ? देशसेवेसाठी कुणीच काम करत नाही ? असे वानखेडे म्हणाले.
ज्या राजकारण्यांकडून एनसीबीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे, ते खूप वरिष्ठ आहेत. मी महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांचा झोनल डायरेक्टर (विभागीय संचालक) आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे कारवाई करतो. जे माझे काम आहे तेच करतोय. असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
मंत्री नवाब मलिक यांनी तुरुंगात पाठवण्याचे वक्तव्य केले आहे, यावर बोलताना वानखेडे म्हणाले, ते खूप मोठे आहेत. मी सामान्य सरकारी नोकर. कुणीही काहीही म्हटल्याने ती जाऊ शकत नाही. तुम्ही आमच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊ शकता, आमच्या चुका दाखवून देऊ शकता. पण माझ्यावर आणि कुटुंबीयांवर वैयक्तिक आरोप केले जातात, हे कितपत संयुक्तिक आहे? त्यापुढे हे काय करणार आहेत हे देखील मला माहिती आहे. तुमच्या एका नातेवाईकाविरोधात मी कारवाई केली होती, त्याची खुन्नस काढण्यासाठी तुम्ही असे व्यक्तिगत, कुटुंबीयांवर आरोप कराल, हे नाही चालणार.
न्यायालयासमोरे केसेस आणि पुरावे सादर करतो. न्यायालयाने आर्यन खानचा दोनदा जामीन नाकारला आहे. असेच इतरांच्याही बाबतीत होते. त्यातून परिवारावर आरोप करणे हे चुकीचे आहे. पण या दबावतंत्रामुळे मला आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे वानखेडष म्हणाले.
आम्ही केलेल्या कारावाईंची एकूण संख्या पाहिली तर बॉलिवूडच्या फक्त दोघा अथवा तिघांविरोधात आम्ही कारवाई केली आहे. बॉलिवूडला टार्गेट करून महाराष्ट्राबाहेर नेण्याचा हा कट असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडण केले.
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा चरसचे नेटवर्क चालवत होता. त्यावेळी आम्ही 30 किलो चरस पकडले होते. त्याच्या भावाची कस्टडी आम्ही याप्रकरणात घेतली होती. तेव्हा कोणी मंत्री कौतुक करण्यासाठी नाही आले. अशश शब्दात त्यांनी टिकाकारांचा समाचार घेतला.