सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याविरुद्ध ‘लाचलुचपत’कडे तक्रार देणार | पुढारी

सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याविरुद्ध ‘लाचलुचपत’कडे तक्रार देणार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व त्यांचे स्वीय सहायक सूर्यकांत मोहिते यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार करणार असल्याची भूमिका जि.प. कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अनिल मोटे यांनी जिल्हा परिषदेच्या सभेत घेतली.

अनिरुध्द कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत सदस्य उमेश पाटील यांनी जि.प. अध्यक्ष कांबळे व त्यांच्या स्वीय सहाय्यकांवर केलेल्या टक्केवारीच्या आरोपावरुन चर्चा झाली. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी व्यक्‍त केली.

जिल्हा परिषदेत साडेचार कोटींची वसुली कशासाठी व कोणासाठी झाली, अध्यक्षपदाच्या निवडीत सदस्यांची खरेदी झाली का? असा प्रश्‍न यावेळी उमेश पाटील यांनी उपस्थित केला. टक्केवारीच्या प्रकरणात सदस्यांनाही ओढण्याचा प्रयत्न होत असल्याने सभागृहातील बहुतांश सदस्यांनी पाटील यांच्या या भूमिकेवर विरोध केला.

आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या तक्रारीवर जर उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येत असेल तर त्याचप्रमाणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक यांना निलंबित का केले नाही, असा प्रश्‍न यावेळी पाटील यांनी उपस्थित केला.

टक्केवारीच्या आरोपावरुन स्वीय सहाय्यक मोहिते यांना नोटीस दिली आहे. त्यांच्याकडून दोन दिवसांत खुलासा येणार असून त्यानंतर कारवाई होईल. यासाठी प्रशासकीय प्रक्रिया आहे. याप्रकरणी सभापती मोटे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, अशी भूमिका सीईओ स्वामी यांनी घेतली.

मी सर्वांसाठीच केले : अनिरुद्ध कांबळे

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्यावरच टक्केवारीच्या आरोपावरून सदस्य उमेश पाटील व सभापती अनिल मोटे यांनी त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सभेच्या सुरुवातीलाचा सुमारे अर्धा तास हा विषय रेटून धरल्यानंतर अध्यक्ष कांबळे म्हणाले, मी सर्वांसाठी केले, माझा यात काडीमात्र संबंध नाही.

Back to top button