भाषेवर प्रभुत्व असणार्या व्यक्ती नेहमीच यशस्वी ठरल्या आहेत. मग ती मायबोली असो किंवा इंग्रजीसारखी परकीय भाषा. दिवंगत नरसिंह राव यांना नऊ भाषा येत होत्या, असे सांगितले जाते. संवाद साधण्यासाठी भाषाज्ञान असणे गरजेचे आहे. लातूरला 1993 मध्ये जेव्हा विनाशकारी भूकंप झाला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी भूकंपग्रस्तांशी मराठीतून संवाद साधला, तेव्हा ग्रामस्थांना संकटाच्या काळातही समाधान वाटले होते. मराठी-इंग्रजीसोबत हिंदी, उर्दू, मल्याळम भाषेबरोबरच परकीय भाषाही आपल्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. हल्ली करिअरसाठी जपान, फ्रेंच, जर्मनी भाषेेला नेहमीच महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवीन भाषा या अर्थार्जनासाठी मोलाच्या सहाय्यभूत ठरतात. परदेशात शिक्षण किंवा नोकरी करायची असेल तर परकीय भाषा आपल्याला उपयुक्त ठरते. आजकाल विद्यापीठ, महाविद्यालय, खासगी संस्था यामध्ये परकीय भाषेच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. पूर्वी ठराविक शहरांतच असे भाषिक शिक्षण उपलब्ध होते. आता परकी भाषा ऑनलाईन माध्यमातूनही शिकता येते.
* शाळा, कॉलेज, विद्यापीठ एवढेच नव्हे तर खासगी शैक्षणिक संस्थेतही परकीय भाषा विभाग असतात. या विभागाची वेळही आपल्या सोयीने असतात. काही ठिकाणी केवळ सुट्टीच्या दिवशी वर्ग घेतले जातात. बहुतांशी विद्यार्थी किंवा पदवीधर हे फावल्या वेळेत परकीय भाषाज्ञान शिक्षणासाठी प्राधान्य देतात.
* परदेशात गेल्यावर तेथील स्थानिक भाषाज्ञान असेल तर परदेशातील संस्कृती, भाषा, तत्त्वज्ञान समजणे सोपे जाते. इटली किंवा फ्रान्सला भेट देताना आपण दोन्ही देशांच्या भाषा अवगत असतील तर आपल्याला त्यांच्या संस्कृतीशी समरस होण्यास वेळ लागत नाही. त्याबरोबर शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने संबंधित देशात स्थायिक व्हायचे असेल तर अशावेळी परकीय भाषा आपल्याला महत्त्वाची मदत करते. परकीय भाषेबाबत सर्वच पातळींवर आपल्याला माहिती उपलब्ध होते. त्याचा लाभ घेत परकीय भाषेचे ज्ञान अधिक सक्षम करू शकतो.
* विविध प्रकारचे व्हिडीओ गेम्स आपल्याला भाषा शिकण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. शब्दकोड्यांसारख्या खेळातून आपल्याला भाषाज्ञान वाढवता येते. वयोगटानुसार हे खेळ ऑनलाईन किंवा ऑफलाईन उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विविध भाषांचे शिक्षण देणारी पुस्तकेही बाजारात असतात. त्या माध्यमातूनही आपण अन्य भाषेबाबतची माहिती अधिक मिळवू शकतो.
* हल्ली परराज्यातील-परदेशातील अनेक विद्यार्थी आपल्याकडे शिक्षणासाठी येत आहेत. त्यांची भाषा जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा फायदाही आपल्याला भाषा संपन्न करण्यासाठी होऊ शकतो.
* गुगल ऑनलाईन ट्रान्सलेट हा एक भाषा शिकण्याचा सोपा मार्ग आहे. आपल्याला हवा असलेल्या शब्दाला अन्य भाषेत काय म्हणतात, यासाठी गुगल ट्रान्सलेटर महत्त्वाची मदत करतो.