भारत इंधन विक्रीत आता सौदीच्या पुढे | पुढारी

भारत इंधन विक्रीत आता सौदीच्या पुढे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : 2022 मध्ये चीननंतर भारत इंधन (ऑईल) आयातीत दुसर्‍या क्रमांकावर होता. वर्षभरातच भारताने युरोपला तेल निर्यातीच्या बाबतीत सौदी अरेबियालाही मागे टाकले आहे. सौदी अरेबियातून युरोपला होणारी निर्यात दिवसाला 3.5 लाख बॅरलवर आहे. दुसरीकडे भारतातून युरोपला दैनंदिन 5.5 कोटी लिटर तेल युरोपात निर्यात केले जात आहे.

24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. परिणामी मार्च 2022 मध्ये कच्च्या तेलाच्या दरात बॅरलमागे 140 डॉलरपर्यंत वाढ झाली. यावेळी भारतात गरजेच्या 60 टक्के आयात आखाती देशांतून होत होती. रशियातून होणारी आयात भारतातील गरजेच्या फक्त 2 टक्के होती.

युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध म्हणून अमेरिका आणि युरोपने रशियावर आर्थिक निर्बंध लादले. रशियातून होणारी इंधन आयातही बंद केली. भारताने एप्रिल 2022 पासून रशियाकडून आंतरराष्ट्रीय दरांपेक्षाही कमी किमतीत तेलखरेदी सुरू केली.

युरोपात तेलाचा तुटवडा निर्माण झालेलाच होता. भारताने याचा फायदा घेतला. एप्रिल 2022 नंतर युरोपीय देशांनी चीन आणि भारताकडून तेल खरेदी वाढविली. या काळात सौदी अरेबियाहून अधिक शुद्ध तेल भारताने युरोपला पाठवले.

भारत तेलाची वॉशिंग मशिन
* भारतातील रिलायन्स, बीपीसीएल आणि आयओसीएल आदी कंपन्या तेल शुद्धीकरण करतात.
* भारतातील या रिफायनरी कंपन्या युरोपला शुद्ध तेल विकून उदंड नफा कमवत आहेत.
* भारताचा समावेश लँड्रोमॅट कंट्रीजमध्ये होतो. लँड्रोमॅट देश म्हणजेच तेलातील घाण काढून टाकणारे देश.

युद्धापूर्वी… युद्धानंतर…

* रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी युरोप भारताकडून दररोज 1.54 लाख बॅरल शुद्ध तेल खरेदी करत असे.
* युद्ध सुरू झाल्यानंतर हा आकडा 2 लाख बॅरल प्रतिदिन आणि मे 2023 मध्ये 3.60 लाख बॅरल प्रतिदिन झाला.
* 2021-22 : या संपूर्ण वर्षात भारताने रशियाकडून 18 हजार कोटी रुपयांचे कच्चे तेल खरेदी केले.
* 2022-23 : पहिल्या सहा महिन्यांत भारताने रशियाकडून 89 हजार कोटी रुपयांचे कच्चे तेल खरेदी केले.

Back to top button