कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : काँग्रेससह भाजपलाही 130 जागांची खात्री | पुढारी

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : काँग्रेससह भाजपलाही 130 जागांची खात्री

बंगळूर; वृत्तसंस्था :  कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर तेथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी 130 जागा जिंकण्याचा दावा केला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक मे महिन्यात होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतेक सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या याद्याही जाहीर झाल्या असून प्रचाराला प्रारंभ झाला आहे. काँग्रेसने राहुल गांधी यांच्या कोलार येथील सभेने प्रचार सुरू केला; तर भाजपचा प्रचार या दोन दिवसांतच सुरू होणार आहे. ही निवडणूक जिंकण्याचे दावे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी केले आहेत.

भाजपचे दक्षिणद्वार बंद होणार : मोईली

कर्नाटकचे ज्येष्ठ काँग्रेस नेते वीराप्पा मोईली यांनी राज्यात काँग्रेसला किमान 130 जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. या निकालामुळे भाजपचे दक्षिणेकडील राज्यांत शिरण्याचे प्रवेशद्वार बंद हाणार आहे. केंद्रातील सरकार स्थापनेबाबत कर्नाटकचा निकाल महत्त्वाचा ठरणार असून येथे लोकांना आता बदल हवा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजप 60 जागांच्या वर जाणार नाही, असेही भाकीत त्यांनी केले.

भाजप सत्ता राखणार : मुख्यमंत्री बोम्मई

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज्यात भाजप विनासायास सत्ता राखेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, पक्षाने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजप 130 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असून भाजपच्या शासनकाळात झालेल्या विकासकामांवरच जनता भाजपला मते देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Back to top button