Lakhimpur Kheri video : लखीमपूर आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चिरडलेला व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Lakhimpur Kheri video : लखीमपूर आंदोलक शेतकऱ्यांना वाहनाने चिरडलेला व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

लखीमपूर खेरीमध्ये रविवारी आंदोलक शेतकऱ्यांना भरधाव वाहनाने चिरडले. यात ९ जणांचा मृत्यू झाला. या दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (Lakhimpur Kheri video) शेतकरी चालत जात असताना मागून जीप शेतकऱ्यांच्या अंगावर घालण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ विरोधी नेत्यांनी शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. याप्रकरणी पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

या व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक शेतकरी हातात फलक आणि झेंडे घेऊन रस्त्यावरून जाताना दिसतात.

अचानक पाठीमागून जीपने अनेकांना चिरडले. यापाठोपाठ एक एसयुव्ही कारही आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर घालण्यात आली.

या अचानक झालेल्या घटनेत काही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले.

Lakhimpur Kheri video : हिंसाचारात ९ जणांचा बळी

दरम्यान, एका वृद्धाला जीपने धडक दिल्यानंतर त्याने बोनेटवर उडी मारली आणि नंतर ते जमिनीवर पडले. या अनपेक्षित घटनेने घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघात झालेल्यांना तातडीने बाजुला करत उपचारासाठी पाठण्यात आले.

उत्तर प्रदेशातील खिरी लखीमपूर येथे हेलिपॅडवर सुरू झालेल्या शेतकरी धरणे आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले.

यावेळी अनेक गाड्यांची मोडतोड करण्यात आली. काही गाड्या पेटवण्यात आल्या. या हिंसाचारात आतापर्यंत ९ ठार झाले.

शेतकऱ्यांचा निषेध

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचे हेलिकॉप्टर उतरणार असलेल्या हेलिपॅडवर शेतकर्‍यांनी रविवारी सकाळपासून कब्जा केला होता. दुपारी पावणेतीन वाजता दोन्ही नेत्यांचा काफिला तिकोनिया चौकातून गेला तेव्हा शेतकरी काळे झेंडे घेऊन त्यांच्या दिशेने धावून आले. या दरम्यान अजय मिश्रा यांचा मुलगा अभिषेक मिश्रा ऊर्फ मोनू याने आपली गाडी शेतकर्‍यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संतापाचा कडेलोट झाला. शेतकर्‍यांनी मोनू यांच्या गाडीसह अनेक गाड्यांची जाळपोळ, तोडफोड केली.

विरोधक नेत्यांना नजरकैदेत ठेवले

दरम्यान, जमावबंदी लागू असताना लखीमपूरच्या दिशेने निघालेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा, बहुजन समाज पक्षाचे एस. सी. मिश्रा आणि ‘आप’चे संजय सिंह यांना लखीमपूरला जाण्यापासून रोखण्यात आले.

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button