मध्य प्रदेशात रेल्वे प्रशासनाकडून चक्क हनुमंताला नोटीस | पुढारी

मध्य प्रदेशात रेल्वे प्रशासनाकडून चक्क हनुमंताला नोटीस

मुरैना : मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात रेल्वे प्रशासनाने चक्क आणि साक्षात बजरंग बलीला नोटीस बजावली आहे. सात दिवसांत आपले अतिक्रमण हटवावे, अन्यथा आम्ही स्वतः तुमचे हे अतिक्रमण पाडण्याची कारवाई करू, असे या नोटिशीत म्हटलेले आहे. पाडापाडीचा खर्चही भगवान हनुमंताकडून वसूल केला जाईल, असा इशाराही या नोटिशीत देण्यात आलेला आहे.

रेल्वेची ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सबलगड भागात ग्वाल्हेर – श्योपूर ब्रॉडगेजचे काम सुरू आहे. या मार्गातच ११ मुखी हनुमान मंदिर येते. हे मंदिर रेल्वेच्या लेखी अतिक्रमण असून, ते हटवावे म्हणून रेल्वेने स्वतः हनुमंताच्या नावे ही नोटीस जारी केली आहे. नोटिशीत स्वत: बजरंग बलीला रेल्वेने पक्षकार बनविले आहे. नजरचुकीने हा प्रकार घडल्याचा खुलासा रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार यांनी केलेला आहे. या मंदिरावर रेल्वेने डकविलेली नोटीस वाचण्यासाठी एकच गर्दी होत आहे.

Back to top button