रशियन तेल खरेदीच्या प्रमाणात भारताकडून वाढ; डिसेंबरमध्ये तेल खरेदीचा उच्चांक | पुढारी

रशियन तेल खरेदीच्या प्रमाणात भारताकडून वाढ; डिसेंबरमध्ये तेल खरेदीचा उच्चांक

नवी दिल्ली : भारताने रशियाकडून गेल्या डिसेंबर महिन्यात तेलाची आतापर्यंतची सर्वात जास्त आयात केली आहे. दिवसाला १० लाख बॅरल इतके तेल भारत रशियाकडून घेऊ लागला आहे. गेले सलग तीन महिने भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात खनिज तेल घेत आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत भारताने वर्षभरात आयात केलेल्या एकूण खनिज तेलापैकी फक्त ०.२ टक्के इतकेच तेल रशिया पुरवीत असे. मात्र आता डिसेंबरमध्ये रशियाने भारताला प्रतिदिन ११.९ लाख बॅरल इतक्या प्रमाणात पुरवठा केला आहे. तेलाची वाहतूक करणाऱ्या व्हर्टेक्सा या कंपनीने ही माहिती दिली.

नोव्हेंबर २०२२ मध्ये भारताने रशियाकडून घेतलेल्या तेलाचे सरासरी प्रमाण दरदिवशी ९ लाख ९ हजार ४०३ बॅरल इतके होते, तर ऑक्टोबर २०२२ मध्ये हे प्रमाण ९ लाख ३५ हजार ५५६ बॅरल इतके होते. व्हर्टेक्साच्या मते, रशियाकडून खनिज तेलाच्या सर्वाधिक
आयातीचा पूर्वीचा विक्रम जून २०२२ मध्ये झाला होता. त्यावेळी भारताने ९ लाख ४२ हजार ६९४ बॅरल प्रतिदिन इतक्या प्रमाणात तेल खरेदी केले होते. भारत आतापर्यंत इराक व सौदी अरेबिया यांच्याकडून सर्वात जास्त तेल आयात करीत होता. या पारंपरिक विक्रेत्यांना मागे टाकून रशियाने प्रथमच ऑक्टोबर २०२२ तेल पुरवठादार म्हणून अव्वल स्थान मिळवले. आता भारतातर्फे आयात होणाऱ्या एकूण तेलामध्ये रशियाचा वाटा २५ टक्के इतका झाला आहे.

रशियाच्या समुद्री भागातून उत्खनन होणाऱ्या खनिज तेलावट युरोपियन युनियनने किंमतीची मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे रशियन तेल प्रति बॅरल ६० डॉलरपेक्षा खूपच कमी दराने उपलब्ध होत आहे, याचाच फायदा भारत सध्या घेत आहे, असे या उद्योगील सूत्रांनी सांगितले. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल वापरणारा आणि आयात करणारा देश आहे.

Back to top button