सीमाप्रश्नी गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक; आज महाराष्ट्राचे सर्वपक्षीय खासदार जाणार | पुढारी

सीमाप्रश्नी गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक; आज महाराष्ट्राचे सर्वपक्षीय खासदार जाणार

नवी दिल्ली/बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (दि. 8) महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी 12.40 वाजता महाराष्ट्राच्या खासदारांना गृहमंत्र्यांनी पाचारण केले आहे. गृहमंत्र्यांच्या कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी ही माहिती दिली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ संदेश प्रसारित केला आहे.

गेल्याच आठवड्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्ली गाठून सीमा प्रश्नावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती. त्यातून त्यांनी कर्नाटकची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्राने सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या कर्नाटक प्रतिवादी क्रमांक 1 असून, केंद्र सरकार हे प्रतिवाद क्रमांक 2 आहेत. त्यामुळे केंद्र सरकार काय भूमिका घेते, हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे उद्या गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला महत्त्व आहे.

Back to top button