पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 50 कि.मी.चा विक्रमी रोड शो | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 50 कि.मी.चा विक्रमी रोड शो

अहमदाबाद, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याच्या प्रचारार्थ विक्रमी रोड शो केला. साडेतीन तासांत 50 किलोमीटर अंतर कापत हा रोड शो तब्बल 16 मतदारसंघांतून गेला.

एकीकडे गुरुवारी पहिल्या टप्प्यात गुजरातमधील 89 मतदारसंघांत मतदान होत असताना पंतप्रधान दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार्‍या मतदारसंघांत प्रचाराचा धूमधडाका उडवून देत होते. हिंमतनगर जिल्ह्यात कलोल येथे जाहीर सभा घेतल्यानंतर ते अहमदाबादेत दाखल झाले. तेथे सायंकाळी त्यांचा रोड शो होता. साडेतीन तासांत 50 किलोमीटर अंतर कापत तब्बल 16 मतदारसंघांत हा रोड शो होता. जागोजाग रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांना हात हलवून, नमस्कार करीत मोदी अभिवादन करीत होते. मोदी यांच्या या रोड शो मुळे चैतन्याचे वातावरण पसरले होते.

हा रोड शो अहमदाबादेत सुरू झाला आणि 16 मतदारसंघांतून जात गांधीनगरला संपला. ठक्करबापानगर, बापूनगर, निकोल, आमराईवाडी, मणीनगर, दानी लिमडा, जमालपूर खाडिया, एलिसब्रिज, वेजलपूर, घाटलोडिया, नरनपूर आणि साबरमती आदी मतदारसंघांतून मोदी यांची ही फेरी होती.

काँग्रेसने कायम गुजरातचा अपमानच केल्याचा आरोप करून मोदी म्हणाले की, हा विरोध डावलून भाजपने राज्याला विकासाची नवी दिशा दिली. त्यामुळेच प्रगत राज्य अशी गुजरातची ओळख निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसवर कडाडून हल्ला

त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंमतनगर जिल्ह्यातील कलोल येथे एका जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. मला शिव्याशाप देण्याची काँग्रेसच्या नेत्यांमध्ये स्पर्धाच लागली आहे. पंतप्रधानांचा अवमान करणे हा आपला अधिकारच असल्यासारखे त्यांचे वर्तन असते. या बद्दल त्यांना खंतही वाटत नाही, अशा तिखट शब्दांत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला.

Back to top button