Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, तोळ्याचा दर ४५ हजारांवर! - पुढारी

Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, तोळ्याचा दर ४५ हजारांवर!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Gold Price Today : जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशातंर्गत बाजारपेठेतही सोन्याचे दर गडगडले आहेत.

मुंबईतील 22 कॅरेट सोन्याचे (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम अर्थात तोळ्याचे दर 45 हजार 780 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दिल्लीत हेच दर 47 हजार 150 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

एकीकडे भांडवली तसेच कमोडिटी बाजारात मोठी तेजी आली आहे. तर दुसरीकडे सोने-चांदीच्या दरात घसरण सुरु आहे.

जागतिक बाजारात सलग दुसर्‍या दिवशी सोन्याचे दर कमी झाले. हे दर आता 1755 डॉलर्स प्रति औंसपर्यंत खाली आले आहेत. एमसीएक्स बाजारात विक्रीमुळे सोन्याचे दर खाली आले. चांदीचे प्रति किलोचे दर 61 हजार 170 रुपयांवर आले आहेत. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

जागतिक बाजारात सोन्याच्या विक्रीचा सपाटा कायम राहिला तर देशातील सोन्याचे दर आणखी खाली येण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भाऊरंगारी कट्टा – राजकीय नेत्यांशी दिलखुलास गप्पा

Back to top button