

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) याच्यावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
सोनू सूदची (Sonu Sood) नुकतीच दिल्ली शालेय शिक्षणासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड झाली. या सुडातून सोनू सूदवर कारवाई केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याशी सलगी वाढल्याने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
राऊत पुढे म्हणाले, सोनू सूदने कोरोना काळात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. देशात लॉकडाऊन पडल्याने देशभरातून मजूर रस्त्यावरून जात होते. यावेळी सोनू सूदने मजुरांना बसेस, रेल्वे, विमान तिकिटे बुकिंग केली होती. याच सोनू सूदचे भाजपने कोरोना काळात कौतुक करत होते. त्याच्यावरच आज हे छापा टाकून दबाव टाकत आहेत. सीबीआय मागे लावण्याचे काम करत आहेत.
पंतप्रधान मोदी देशातील आतापर्यंतचे लोकप्रिय मोठे नेते आहेत. त्यांचा संघर्ष आम्ही पाहिला आहे. भाजपला देशभरात पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या काळात भाजपला मोठे राजकीय स्थैर्य लाभले आहे. आज देशात त्यांच्या तुलनेचा नेता पहायला मिळत नाही. मोदींच्या संघर्षाच्या काळ आम्ही जवळून पाहिला आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
मला माजी मंत्री म्हणू नका. दोन-तीन दिवसांतच तुम्हाला याचे कारण कळेल, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी खळबळ उडवून दिली. यावर संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. सध्या राज्यात राजकीय बदल होत आहेत. त्यामध्ये पाटील यांची नियुक्ती नागालँडच्या राज्यपाल पदी होणार असल्याचे राऊत म्हणाले.