शेतकर्‍यांना शतावरी अश्वगंधा लागवडीच्या बहाण्याने २३ कोटीचा गंडा - पुढारी

शेतकर्‍यांना शतावरी अश्वगंधा लागवडीच्या बहाण्याने २३ कोटीचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शतावरी अश्वगंधा यासारख्या औषधी वनस्पती शेतात लागवड केल्यानंतर त्या विकत घेण्याचे प्रलोभन दाखवून पुणे, सोलापूर आणि रायगड जिल्ह्यातील पाचशे पेक्षा अधिक शेतकर्‍यांना तब्बल २३ कोटी ४५ लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने एकाला अटक केली आहे. ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर (वय ३८, रा. आकाशदीप सोसायटी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी राहुल शहा (वय 46, रा. जयराज किरण सोसायटी, वाळवेकरनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पाटणकर याच्या विरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शतावरी, अश्वगंधा या औषधी वनस्पतींची शेतात लागवड केल्यानंतर येणारे पिक एकरी ३ लाख रुपये मोबदला देऊन विकत घेण्याचे आमिष शेतकर्‍यांना पाटणकर दाखवत असे. एवढेच नाही तर नागरिकांना योजनेबाबत विश्वास वाटावा म्हणून आयुष मंत्रालयाचा संदर्भ देते असे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक केली. निर्धारीत कालावधी पूर्ण झाल्यानंतर देखील पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

आमिष दाखवून एकरी ५० हजार केले गोळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटणकर याने तीन वर्षांपूर्वी शुन्य हर्बल अग्रो डेव्हलपमेट प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली. त्याने असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदार यांना शतावरी अश्वगंधा या औषधी वनस्पतीची त्यांचे शेतात लागवड करावी, असे सांगितले. येणारे पिक स्वत: विकत घेऊन त्यांना दरवर्षी एकरी ३ लाख रुपये मोबदला देण्याचे आमिष दाखविले. तसेच त्यासाठी एकरी ५० हजार रुपये कंपनीकडे जमा करायचे कंपनी शेतकऱ्यांना रोपे देणार, त्यांची लागण ते स्वत: करणार, सुपरव्हिजन करणार, खते देणार, एक वर्षांनी कंपनी स्वत: काढणी व वाहतूक करुन शेतकऱ्यांना जागेवर पैसे देणार अशी विविध आश्वासने दिली.

त्यानुसार सोलापूर, पुणे,रायगडसह अन्य जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कंपनीकडून रोपे घेऊन लागवड केली. त्यानंतर १८ महिन्यांनी त्यांनी मालही काढून नेला. परंतु, शेतकर्यांना पैसे मात्र दिले नाही. गेले दीड -दोन वर्षे शेतकरी पुण्यात अरण्येश्वर येथील कंपनीच्या कार्यालयात पैशांसाठी हेलपाटे मारत होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचीही शेतकर्यांनी भेट घेतली.

तरीही काही उपयोग न झाल्याने शेवटी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटून शेतकर्यांनी आपली हकीकत सांगितली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास करुन ऋषिकेश पाटणकर याला अटक केली आहे. त्याने अशा प्रकारे असंख्य शेतकरी आणि गुंतवणुकदार यांची सुमारे २३ कोटी ४५ लाख १ हजार ९९४ रुपयांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेने ऋषिकेश पाटणकर याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सहाणे अधिक तपास करीत आहेत़.

दुसरा महेश मोतेवार?

समृद्ध जीवनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या आकर्षक गुंतवणूक स्किम राबत राज्यासह परराज्यातील नागरिकांना आर्थिक गंडा घालणार्‍या महेश मोतेवार याच्या प्रमाणेच ऋषीकेश पाटणकर याने शेतकर्‍यांना वनस्पतीच्या लागवडीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने कोट्यावधींचा गंडा घातल्याचे दिसून येते.

महेश मोतेवार याने शेळीपालनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांन जाळ्यात खेचले होते. तसेच पाटणकर याने देखील औषधी वनस्पतील विकत घेण्याच्या माध्यमातून गंडा घातला. शेतकर्‍याना विश्वास वाटावा म्हणून तो चक्क भारत सरकारच्या आयुषमंत्रालयाचा हवाला देत होता.

पाटणकर याने पुणे, सोलापूर, रायगडसह अन्य जिल्ह्यातील शेतकर्‍यांना औषधी वनस्पतींची लागवड करून ती विकत घेण्याच्या बहाण्याने कोट्यावधींचा गंडा घातला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. अंदाजे ५०० पेक्षा अधिक शेतकर्‍यांना पाटणकर याने फसविले आहे.

राजेंद्र सहाने, पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे

Back to top button