गंभीर गुन्ह्यांत जामीन देताना जिल्हा न्यायाधीश घाबरतात : सरन्यायाधीश चंद्रचूड | पुढारी

गंभीर गुन्ह्यांत जामीन देताना जिल्हा न्यायाधीश घाबरतात : सरन्यायाधीश चंद्रचूड

नवी दिल्ली वृत्तसंस्था :  गंभीर गुन्ह्यांत जामीन देताना जिल्हा न्यायाधीश घाबरत असल्यानेच उच्च न्यायालयात जामिनाच्या याचिकांची संख्या वाढली असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केले. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने आयोजन करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, जिल्हा स्तरावरील न्यायाधीशांना गुन्हा समजून येत नाहीत. एखाद्या गुन्हेगारांना जामीन दिल्यानंतर आपणास लक्ष्य केले जाण्याची त्यांना भीती वाटते. याबाबत आता आपण विचार करण्याची वेळ आली आहे. जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास घाबरत असल्याने त्यांच्यावरील ताण कमी होत असला, तरी उच्च न्यायालयांवरील ताण वाढत आहे. जिल्हा न्यायालयाच्या कामकाजात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. सर्वात पहिल्यांदा जिल्हा न्यायाधीशांमध्ये सन्मानाची भावना निर्माण करण्याची गरज आहे. जिल्हा न्यायपालिका महत्त्वाची असून त्याचे स्थान राष्ट्रीय न्याय पालिकेत आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे जिल्हा न्यायपालिकाही मोठे निर्णय घेऊ शकते; मात्र जिल्हा न्यायाधीश केवळ छोट्या-छोट्या प्रकरणांचा निवाडा करण्यात आनंद मानत आहेत.

सत्ताधार्‍यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा

राष्ट्रीय द़ृष्टिकोनाचा विचार करूनच सर्वोच्च न्यायालयात निर्णय घेतले जातात. कायदेशीर आणि सामाजिक मुद्दे वेगवेगळे असतात. सत्तेतील लोकांनी आम्हाला आवश्य प्रश्न विचारावेत; मात्र आमच्या निर्णयावरही त्यांनी विश्वास ठेवायला हवा, तरच चांगले काम करण्यास मदत होणार असल्याचे चंद्रचूड यावेळी म्हणाले.

Back to top button