रब्बी हंगामात गहू लागवड क्षेत्रात १० टक्क्यांची वाढ | पुढारी

रब्बी हंगामात गहू लागवड क्षेत्रात १० टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी लागवड करण्यात आली आहे. यंदा गहू लागवडीच्या क्षेत्रात १० टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. १ ऑक्टोबरनंतर देशातील विविध राज्यातील शेतकऱ्यांनी साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामातील प्रमुख नगदी पिकांमध्ये गव्हाचा समावेश होतो.

रब्बी हंगाम २०२२ च्या सुरुवातीपासून सुरु असलेल्या गव्हाच्या पेरणीखालील क्षेत्राने गेल्या वर्षीचा विक्रमही ओलांडला आहे. भारतात गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून वापरही होतो. भारतातूनच गव्हाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. यंदा केंद्र सरकारने गव्हाचे उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने देशात यंदा मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड केली जात आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात गहू लागवड होते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत तुरळक ठिकाणी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलाव्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. गव्हाच्या पेरणीसाठी जमिनीतील ओलावा ही चांगली गोष्ट आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. अनेक भागात गहू व इतर रब्बी पिकांची पेरणी वेळेत झाली आहे. भारतात गव्हाची फक्त एकदाच कापणी केली जाते. रब्बी हंगामाच्या मध्यभागी थंड तापमानापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गव्हाची पेरणी केल्यानंतर, मार्च-एप्रिलमध्ये पीक काढणीसाठी तयार होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button