अफजल खानाच्या कबर संबंधी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

अफजल खानाच्या कबर संबंधी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अफजल खान याची कबर पाडण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी (दि.११) सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश डी.व्हाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती जे.बी.पारडीवाला यांच्या खंडपीठासमक्ष वकील नझीम पाशा यांनी याचिकेचा उल्लेख करीत यासंदर्भात मौाखिक यथास्थितीचे निर्देश देण्याची मागणी केली. पंरतु, याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार असून मौखिक निर्देशांची आवश्यकता नसल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले.

हाज मोहम्मद अफजल खान मेमोरियल सोसायटीच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. विजापूरमधील आदिलशाही घराण्याचा अफझल खान सेनापती होता. साताऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. अफजल खानाची कबर हटवण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकेवर सुनावणी घेत वनक्षेत्रात असलेलेली ही कबर पाडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. पंरतु, हे बांधकाम पाडण्यात आले नव्हते.

याप्रकरणी अवमान याचिका दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने राज्य सरकारला शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान देण्यात आले होते. यावर २७ मार्च २०१७ रोजी सुनावणी घेत सर्वोच्च न्यायालयाने अवमाननाची कारवाई पुढे ढकलण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली होती. २६ मे २०२२ रोजी कबर पाडण्याचे आदेश देण्यात आल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, गुरूवारी कबर पाडली जाईल या भीतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. थडगे पाडण्यासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांचे मराठी वृत्तवाहिनेकडून केलेले लाईव्ह कव्हरचे स्क्रीनशार्ट देखील याचिकेसोबत जोडण्यात आले आहेत. नोव्हेंबर १६५९ पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या अफझलखानच्या कबरीचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्देश देण्याची विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button