मुुस्लिम बांधव साकारताहेत रामाचे भव्य गर्भगृह | पुढारी

मुुस्लिम बांधव साकारताहेत रामाचे भव्य गर्भगृह

अयोध्या;  वृत्तसंस्था : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे गर्भगृह साकारण्याची जबाबदारी राजस्थानातील मुस्लिम बांधवांकडे आहे. राजस्थानातील मकराना येथील संगमरवरातून रामलल्लांसाठी गर्भगृह तयार केले जात आहे. गर्भगृहाचे कंत्राट रमजानभाई रांदर यांना देण्यात आले आहे आणि गाभार्‍याचे वास्तुविशारद (आर्किटेक्ट) आहेत झिया उल उस्मानी!

राममंदिराचे गर्भगृह तीन मजली आहे. प्रत्येक मजल्यावर आठ दरवाजे आहेत. या मंदिराचे 21 दरवाजे जवळपास तयार आहेत. तीन मुख्य दरवाजांचे काम सुरू आहे. तळमजल्याचे 8 दरवाजे, मंदिरातील अन्य देवतांची आसने, आरती चौकट असे बरेच काही आम्ही अयोध्येला पाठवून झाले आहे, असे रमजानभाई यांनी सांगितले.

आर्किटेक्ट झिया उल उस्मानी राम सिंहासनाच्या ‘डिझाईन’मध्ये व्यग्र आहेत. सिंहासनासाठी अनुरूप दर्जाचे
संगमरवर अजून हाती लागलेले नाही. त्यासाठी माझा शोध सुरू आहे. शेवटी त्यावर अवघ्या जगासाठी आदर्श असलेले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आसनस्थ होणार आहेत, असे झिया उल उस्मानी सांगतात. संगमरवरावर ठिकठिकाणी सोन्या- चांदीचे नक्षीदार अस्तर चढविले जाईल, असेही ते म्हणतात.

झाकीरभाई सांभाळताहेत रामजन्मभूमीचे संपूर्ण काम

आम्ही तर गर्भगृह, दरवाजे, सिंहासन असे सगळे बघतो आहोत. पण, श्रीराम जन्मभूमीचे एकूणच काम माझा मोठा
मुलगा झाकीर बघतो आहे, असेही रमजानभाईंनी सांगितले.

ताजमहालहून दर्जेदार मार्बल

आग्रा येथील ताजमहाल, कोलकात्यातील व्हिक्टोरिया पॅलेसपेक्षा दर्जेदार मार्बल आम्ही राम मंदिरासाठी निवडलेला
आहे. या मार्बलमध्ये 99 टक्के कॅल्शिअम आहे. लोहाचे प्रमाण अजिबात नाही, असेही रमजानभाई म्हणाले.

सिंहासन, राम दरबारच नव्हे तर अगदी आरतीचे दिवेही आम्हाला श्रीरामचंद्रांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे बनवायचे आहेत.
– रमजानभाई रांदर, मकराना, राजस्थान

Back to top button