रेल्वे प्रवास महागला | पुढारी

रेल्वे प्रवास महागला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर देशभरातील 130 मेल-एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्ट गाड्यांचा दर्जा देऊन सर्व श्रेणींमध्ये भाडेवाढ करण्यात आली आहे. ‘एसी-1’ (वातानुकूलित) आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’च्या गाड्यांचे प्रवास भाडेही वाढविण्यात आले आहे. ‘एसी-1’साठी 75 रुपये, ‘एसी-2, 3 चेअर कार’साठी 45 रुपये आणि ‘स्लीपर क्लास’साठी 30 रुपये भाडे वाढवण्यात आले आहे.

अशाप्रकारे प्रवाशांना, एक पीएनआर (सहा प्रवाशांसाठी) रेल्वे तिकीट बुकिंग करताना एसी-1 मध्ये 450 रुपये, एसी-2 मध्ये 270 रुपये, 3 आणि स्लीपर कोचमध्ये 180 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. ही भाडेवाढ एक ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे.

‘खानपान’, सुरक्षा किंवा सुविधांच्या दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. रेल्वेने सर्व वर्गांच्या भाड्यात वाढ केली आहे. रेल्वेने नव्या नियमांनुसार, ताशी सरासरी 56 कि.मी. वेगाने धावणार्‍या गाड्यांना आपल्या वेळापत्रकातून सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिलेला आहे.

भारतीय रेल्वे 45 वर्षांपासून ट्रेनचा सरासरी वेग वाढवण्यात अपयशी ठरली आहे. या चार दशकांपासून मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा सरासरी वेग ताशी 50 ते 58 कि.मी. आहे, तर रेल्वेच्या प्रीमियम राजधानी, शताब्दी, दुरंतो इत्यादी गाड्यांचा सरासरी वेग ताशी 70-85 कि.मी. आहे. 60 टक्के गाड्या 15 ते 20 मिनिटे गंतव्यस्थळावर उशिराने पोहोचतात. केवळ 15-20 टक्के गाड्या कधीतरी वेळेवर पोहोचतात.

2022-23 या वर्षातील नवीन रेल्वे वेळापत्रकामध्ये रेल्वे विभागाने बहुतांश पॅसेंजर गाड्यांना मेल-एक्स्प्रेसचा दर्जा दिलेला आहे. आता भाडेवाढीमुळे या गाड्यांमधून लाखो प्रवासी ये-जा करू शकणार नाहीत. उदाहरणार्थ दिल्ली-भटिंडा पॅसेंजर ट्रेनला आता मेल-एक्स्प्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. या रेल्वेचे अंतर 298 कि.मी. आहे. दिल्ली-सहारनपूर पॅसेंजरलाही मेल-एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. आता या गाड्यांमधून प्रवाशांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. विनातिकीट प्रवास केल्यास भाडे आणि दंड दोन्ही आकारले जातील, तो धाक वेगळा!

Back to top button