मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना अटक | पुढारी

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना अटक

रायपूर ; वृत्तसंस्था : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राह्मणविरोधी वक्तव्यावरून पोलिसांनी अटक केली आहे. नंदकुमार बघेल यांनी भारतातील सर्व गावांतून ब्राह्मणांवर बहिष्कार घालण्यात यायला हवा, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर छत्तीसगड पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यावर प्रतिक्रिया देताना कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असे नमूद केले. ते म्हणाले की, वडील म्हणून मला असलेला आदर स्वाभाविक आहे; पण एखाद्या समुदायाबद्दल त्यांनी असे वक्तव्य करणे योग्य नाही.

रायपूर पोलिसांनी नंदकुमार बघेल यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सकल ब्राह्मण समाज संघटनेने दिलेल्या तक्रारीवरून डी. डी. नगर पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री बघेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

धर्म, वंश आदींच्या आधारे विविध समुदायांमध्ये वैरभावना निर्माण करणे यासह अन्य आरोप नंदकुमार यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. प्रभू श्रीरामचंद्रांबद्दलही यापूर्वी नंदकुमार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

20 वर्षांपूर्वी…

वीस वर्षांपूर्वी नंदकुमार बघेल यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्यातूनही त्यांनी ब्राह्मणांवर प्रहार केले होते. ब्राह्मण हे व्होल्गा (रशियातील नदी) नदीच्या काठावरून गंगेच्या काठावर आलेले आहेत. ब्राह्मण परंपरा ही इतर समुदायांना तुच्छ लेखत आलेली आहे. ब्राह्मणांना पुन्हा व्होल्गाकडे हकलून लावायला हवे, असे त्यांनी या पुस्तकात नमूद केले होते.

2001 मध्ये छत्तीसगडमधील तत्कालीन काँग्रेस सरकारने या पुस्तकावर बंदी घातली होती. पुस्तकावरील सरकारची बंदी न्यायालयानेही योग्य ठरवली होती. सध्याही छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.

Back to top button