कोरोना मधून बरे झालेल्यांच्या मागे ब्लॅक फंगस, व्हाईट फंगस, हर्पेस झोस्टर आदी नानाविध तापदायक आजारांसह विविध अन्य आरोग्यविषयक समस्यांचा ससेमिरा सुरू आहेच. आता एका नव्या अध्ययनातून कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना मेंदूच्या संपर्क यंत्रणेशी संबंधित समस्या उद्भवत असल्याची बाब समोर आली आहे. या अध्ययनानुसार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये 'पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस'ची (आघातानंतर उद्भवणारी लक्षणे) लक्षणे लक्षणीय प्रमाणात आढळत आहेत.
वास्तविक एकूण स्वरूप पाहता कोरोना हा एक श्वसन विकार आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोना हा आजार मज्जातंतूविषयक यंत्रणेवरही परिणाम घडवून आणतो. प्रसंगी मज्जासंस्थेवर गंभीर परिणामही कोरोनामुळे होऊ शकतो. काही कोरोनामुक्तांमध्ये मानसिक आरोग्यविषयक समस्या आढळून आल्या आहेत. चिंतामग्न असणे, तणावग्रस्त असणे, 'पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर' (पीटीएसडी, आघातानंतर उद्भवणारी लक्षणे) अशा नानाविध समस्यांचा सामना हे रुग्ण करत आहेत.
कोरोनातून बरे झालेल्यांच्या मेंदूच्या कार्यप्रणालीवरही विपरीत परिणाम झाल्याचेही काही अध्ययनांचे निष्कर्ष आहेत. विशेष म्हणजे याचे फलित म्हणून दीर्घकालीन मानसिक समस्या उद्भवणेही शक्य आहे.
कोरोनामुक्तांच्या मेंदू यंत्रणेतील बहुतांश भागाच्या कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होत आहे, की परस्परांशी समन्वय साधणार्या मेंदूच्या विविध स्वतंत्र भागांवर विपरीत परिणाम होत आहे, हे तणावाच्या मज्जासंस्थीय जीवशास्त्रातील (न्युरोबायोलॉजी इन स्ट्रेस) तज्ज्ञ संशोधकांनी या अध्ययनातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
संशोधकांनी रुग्णांचे कार्यात्मक एमआरआय डेटा तसेच 'पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस'च्या तक्रारींतील लक्षणांचा आढावा घेतला. वुहान (चीन) येथील विविध रुग्णालयांतून हे कोरोना रुग्ण फेब्रुवारी आणि मार्च 2020 दरम्यान बरे होऊन घरी गेले होते. डिस्चार्ज झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत त्यांच्या मेंदूच्या कार्यप्रणालीची चाचणी घेण्यात आली.
मनोरुग्णांचे प्रमाणही लक्षणीय!
वैद्यकीय क्षेत्रातील एका ख्यातनाम 'जर्नल'मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार कोरोनातून बरे झालेल्या एकूण 2 लाख 32 हजार जणांवर 6 महिने केलेल्या अध्ययनाअंती 24 टक्के लोक मनोरुग्ण झाल्याचे समोर आले आहे.