दूध दरवाढीचा परिणाम! तीनपैकी एक कुटूंब आता दूधाचा वापर करतंय कमी | पुढारी

दूध दरवाढीचा परिणाम! तीनपैकी एक कुटूंब आता दूधाचा वापर करतंय कमी

पुढारी ऑनलाईन: अलीकडच्या काळात दूधाचे भाव सातत्याने वाढत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की, देशातील दर तीनपैकी एका कुटुंबाने दूध खरेदी करणे बंद केले आहे. किंवा इतर पर्याय पाहू लागले आहेत. ऑगस्ट महिन्यात अमूलपासून मदर डेअरीपर्यंत सर्वांनी महागाईचे कारण देत दूधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. महागाईच्या फटक्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना दूधाच्या दरात वाढ करण्यात आली. दूधाचे दर वाढल्याने सर्वसामान्य लोकांचे बजेट बिघडले आहे.

ऑगस्ट महिन्यात मदर डेअरीप्रमाणेच अमूलने दूधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली होती. लोकलसर्कल या संस्थेने दूध दरवाढीबाबत सर्वेक्षण केले. 311 जिल्ह्यांत 21000 लोकांचा अभिप्राय घेतला. सर्वेक्षणात 68 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांचा दूधाचा वापर पहिल्यासारखाच आहे. पण, त्यांना आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. तर 6 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी आता स्वस्त ब्रँड किंवा स्थानिक पुरवठादारांकडून दूध घेण्यास सुरुवात केली आहे. तर ४ टक्के लोकांनी त्याच ब्रँडचे स्वस्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले.

सर्वेक्षणातील सहभागींपैकी कोणीही असे म्हटले नाही की, आता ते दूधाचा वापर करत नाहीत. परंतु, 20 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी पूर्वीच्या तुलनेत दूधाचा वापर कमी केला आहे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या 10,522 लोकांपैकी 72 टक्के लोकांनी सांगितले की, ते अर्धा लिटर किंवा एक लिटरचे पाऊच असलेले दूध विकत घेत आहेत. 12 टक्के लोक थेट स्थानिक फार्म किंवा बॉटलिंग प्लांटमधून दूध खरेदी करत आहेत. त्याच वेळी 14 टक्के लोक स्थानिक विक्रेत्यांकडून अनपॅक केलेले दूध विकत घेत आहेत. फक्त 2% लोक टेट्रा पॅक दूधाचे सेवन करतात. दूधाचे दर वाढले असतानाही ६८ टक्के कुटुंबे पूर्वी वापरत असलेलेच दूध विकत घेत आहेत. परंतु 32 टक्के लोकांनी त्यांचा वापर कमी केला आहे किंवा त्याच ब्रँडचे दूध स्वस्तात विकत घेणे सुरू केले आहे.

Back to top button