चंद्रकांत पाटील, “आता ते सकाळी ब्रशही न करता मोदींना शिव्या घालू लागलेत” | पुढारी

चंद्रकांत पाटील, "आता ते सकाळी ब्रशही न करता मोदींना शिव्या घालू लागलेत"

अमरावती, पुढारी ऑनलाईन : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलेले काही लोक दररोज सकाळी ब्रशही न करता त्यांना शिव्या घालू लागले आहेत. पण, त्याने काहीही फरक पडत नाही. राजकारणात पाठीत खंजीर खुपसणे हा शब्द उच्चारताच पूर्वी एक चेहरा समोर यायचा. आता त्या जागी दुसरा येऊ लागला आहे”, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

मोर्शी येथे बुधवारी आयोजित भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राज्यात भाजपचे सरकार एकट्याच्या बळावर येईल, हे चित्र दिसत आहे. शिवसंग्राम, रयत, राष्ट्रीय समाज पक्ष यासारखे अनेक पक्ष आपल्यासोबत आहेत. अजूनही काही छोटे पक्ष सोबत येण्यास इच्छुक आहेत. पण, यापुढे नाव मोठे लक्षण खोटे असा पक्ष सोबत नको. आता कुणाच्याही  कुबड्या नकोत. तुमची संगतही नको”, असा टोला पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

तपास यंत्रणा मागे लावून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र भाजपकडून सुरू असल्याचा आरोप राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की, “महाविकास आघाडीमधील नेत्यांना फोडण्याचे काम आमचे नाही. उलट अनेक नाराज नेते स्वत:हून रात्रीच्या अंधारात आम्हाला भेटायला येतात. त्यामुळे महाविकास आघाडीमधील नाराज लोकांना आधी सांभाळा”, असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी दिला.

‘ईडी’ची यादी माझ्याकडे नसून सर्वसामान्य लोकांकडून ती येत आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख, छगन भुजबळ, एकनाथ खडसे यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे, तो कार्यकर्त्यांनी समोर आणावा, असेही आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केला.

पहा व्हिडीओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button