‘तो’ इच्छेनुसार डोळ्यातील बाहुलीचा आकार बदलू शकतो! | पुढारी

‘तो’ इच्छेनुसार डोळ्यातील बाहुलीचा आकार बदलू शकतो!

बर्लिन : डोळ्यातील जो मध्यभागी असलेला गडद वर्तुळाकार भाग असतो त्या बाहुलीचा आकार बदलणे ही ऐच्छिक गोष्ट नसते असे आतापर्यंत मानले जात होते. मात्र, जर्मनीतील 23 वर्षांच्या एका विद्यार्थ्याला स्वतःच्या इच्छेप्रमाणे या ‘प्युपिल’चा आकार बदलता येतो. तो इच्छेप्रमाणे ही बाहुली किंवा पुतळी मोठी करू शकतो किंवा तिचा आकार संकुचितही करू शकतो.

डोळ्यांमधील सूक्ष्म विरोधी स्नायू प्रत्येक बाहुलीसाठी ‘प्युटीअर्स’ म्हणून काम करीत असतात. अंधार असलेल्या ठिकाणी अधिक प्रकाश मिळवण्याच्या हेतूने बाहुलीचा आकार वाढत असतो तर प्रखर प्रकाशाच्या ठिकाणी डोळ्यात जाणार्‍या प्रकाशकिरणांना मर्यादित करण्यासाठी तो कमी होत असतो. ही प्रक्रिया पूर्णपणे ‘ऑटोमॅटिक’ असते असेच आतापर्यंत मानले जात होते. ज्यावेळी तुम्ही अंधार्‍या खोलीत जाता त्यावेळी डोळ्यांमधील बाहुल्यांना आकार बदलण्याची तुम्हाला सूचना द्यावी लागत नाही.

ही क्रिया आपोआपच घडते. या बाहुलीचा आकार बदलण्यात अन्यही काही घटक कारणीभूत होत असतात. बाहुल्यांचा असा आकार काही लोक अप्रत्यक्ष पद्धतीने बदलू शकतात हे यापूर्वी दिसून आले होते. ही पद्धत मानसिकच असते, म्हणजे अंधार्‍या खोलीची कल्पना करणे किंवा आपण सूर्याकडे पाहत आहोत अशी केवळ कल्पना केल्यानेही बाहुल्यांचा आकार बदलू शकतो.

नेदरलँडमधील युट्रेच युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्र विभागाच्या ख्रिस्तोफ स्ट्रॉच यांनी ही माहिती दिली आहे. मात्र, प्रत्यक्षपणे आपल्या सूचनेनुसार एखाद्याला प्युपिलचा आकार बदलता येईल असे आतापर्यंत दिसले नव्हते. डोळ्यातील स्नायू प्रत्यक्षपणे नियंत्रित करणे शक्य आहे असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र, जर्मनीतील उल्म युनिव्हर्सिटीतील सायकॉलॉजी म्हणजेच मानसशास्त्राचा विद्यार्थी हे करू शकतो.

याच विद्यापीठात स्ट्रॉच पीएच.डी.चे विद्यार्थी होते. तो पंधरा किंवा सोळा वर्षांचा होता त्यावेळीच त्याला आपल्यामधील या विशेष क्षमतेची जाणीव झाली होती. ‘डी. डब्ल्यू’ अशा आद्याक्षरांनीच या विद्यार्थ्याची ओळख देण्यात आली आहे. त्याने उल्म युनिव्हर्सिटीत स्ट्रॉच आणि त्यांच्या सहकार्‍यांना याबाबतची माहिती दिली.

सुरुवातीला तो एखाद्या वस्तूच्या पुढे किंवा मागे लक्ष केंद्रीत करून हे करीत असे. मात्र, नंतर सरावानंतर त्याने एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रीत न करताही ते कसे करावे हे त्याने शिकून घेतले. प्युपिलचा आकार बदलण्यासाठी मला केवळ डोळ्यांवरच लक्ष केंद्रीत करावे लागते, त्यासाठी अंधार्‍या किंवा उजेडाच्या जागेची कल्पना करावी लागत नाही असे त्याने सांगितले.

Back to top button