उपायुक्‍त कल्पिता पिंपळे : अ(न)धिकृतांची मुजोरी! | पुढारी

उपायुक्‍त कल्पिता पिंपळे : अ(न)धिकृतांची मुजोरी!

ठाणे महानगरातील एका फेरीवाल्याने पालिका उपायुक्‍तांवर चाकूहल्ला करून त्यांची बोटे छाटल्याची घटना नुकतीच घडली. त्याला पोलिसांनी तत्काळ अटकही केली आणि उपायुक्‍तांवर उपचारही झाले; पण कायद्याचे राज्य कुठे आहे, असे म्हणून सरकार वा पालिकेवर दुगाण्या झाडून तो विषय संपणारा नाही. जे नियम केले जातात आणि त्याच्या अंमलबजावणीचे इशारे दिले जातात, त्याचा खरोखरच किती अंमल चाललेला असतो आणि किती प्रमाणात असे कायदे, नियम पायदळी तुडवले जात असतात, याला खरे महत्त्व आहे. कारण, अशा नियम पायदळी तुडवण्यातूनच उपायुक्‍त कल्पिता पिंपळे यांच्यासारख्या अधिकार्‍यांवर प्राणघातक हल्‍ले होत असतात.

या प्रवृत्तींची हिंमत तशीच वाढत जात असते. आधुनिक समाजात हत्याराला वा शस्त्राला रोखण्यासाठी जे प्रभावी अवजार निर्माण करण्यात आले, त्याला कायदा वा नियम म्हणतात. पशू जीवनातून बाहेर पडत माणसाने सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचे प्रयत्न हजारो वर्षांपूर्वी आरंभले. त्यातले सर्वात प्रभावी भेदक हत्यार नियम हेच आहे; पण आजही आपण त्या पशुवत जीवनशैलीतून पूर्णपणे मुक्‍त झालो नाही, इतकाच ठाणे शहरातील घटनेचा अर्थ; मात्र त्याला तो कोणी यादव नावाच्या एखाद्या उन्मत्त फेरीवाल्यास जबाबदार धरता येत नाही. आपण सगळेच त्याला तितकेच जबाबदार आहोत. जितके भ्रष्ट पालिका अधिकारी व पोलिस कारणीभूत, तितकेच त्यांच्याकडे बघून नाक मुरडणारे सामान्य नागरिकही जबाबदार. कारण, फेरीवाले नेहमीच अनधिकृत असतात वा कायदा धाब्यावर बसवून रस्त्यावर आपला व्यापार मांडतात. पैसे वा लाच खाऊन पोलिस वा अधिकारीच त्यांना संरक्षण देत असतात. आज-काल त्यात स्थानिक लोकप्रतिनिधी वा स्थानिक गुंडांचा देखील समावेश झालेला आहे.

यापैकी सर्वांचाच आशीर्वाद असल्याखेरीज कोणी अनधिकृत फेरीवाला वा अधिकृत उद्योजकही कारभार करू शकत नसतो. त्यामुळे त्यांच्या माथी खापर फोडले, मग आपण सगळे कसे शुचिर्भूत आहोत ते मिरवायला मोकळे होतो ना? पण, त्या सर्व भ्रष्ट लोकांपेक्षा आपली जबाबदारी किंचीत कमी असते का? त्याकडे पाठ फिरवून आपण निर्दोष कसे असू शकतो? खरे तर, आपल्याकडे बोट कोणी दाखवत नाही इतकेच! या सर्व बेकायदा व्यवसाय-व्यापाराचे आश्रयदाते ग्राहक म्हणजे सामान्य नागरिकच नसतात का? ग्राहकच नसेल वा अनधिकृत फेरीवाल्याकडून खरेदीच होणार नसेल, तर तिथे तो बसेल कशाला? बसणार नसेल, तर त्याला हप्ते खाऊन पालिका, पोलिस व लोकप्रतिनिधी तरी मदत कशी करू शकतील? मग, कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्याचा दोषी वा आरोपी फक्‍त तो फेरीवालाच कसा असू शकेल? त्याच्या आश्रयदात्यांना कोणी पकडायचे?

कुणाच्या तरी माथ्यावर खापर फोडून पळण्याची आपली सामान्य माणसाची ही मनोवृत्तीच आधुनिक समाजात मोठी समस्या बनलेली आहे. नियम, कायदे खूप बनवले जातात आणि प्रशासनात बसलेल्या अधिकारी राज्यकर्त्या पक्षापासून गुन्हेगार व्यापार्‍यापर्यंत सर्वांना कुठल्या ना कुठल्या निर्बंध, प्रतिबंधाचा कायदा आवडत असतो. कारण, तो कायदा इतरांना भयभीत करून गुन्हेगारांना व अंमलदारांना लाभदायक ठरू शकत असतो. प्रशासनकर्त्यांना त्यातून ‘अतिरिक्‍त कमाई’ करायची सुविधा उभी राहते आणि कायदा, नियम धाब्यावर बसवण्याची हिंमत नसलेले स्पर्धेतून बाजूला फेकले जातात.

यादव तसा गुंड प्रवृत्तीचा इसम नसता, तर त्याला तिथे रस्ता अडवून दुकान मांडण्याची हिंमत झाली असती काय? सद‍्गुणी वा सत्प्रवृत्त व्यक्‍तीला रस्त्यावर दुकान मांडून काम-धंदा करणेही आज कायद्याच्या राज्यात अशक्य आहे. आजकाल त्याची राजरोस चर्चा सगळ्या सभ्य व्यासपीठावरून रंगलेली नाही काय? परमबीर, मनसुख हिरेन, सचिन वाझे किंवा अनिल देशमुख, अनिल परब यांच्यावर चाललेले माध्यमांतील पांडित्य कशाविषयी आहे? कायद्याचा सुटसुटीत अंमल की कायदे मोडण्यातून येणार्‍या खंडणीविषयीचा ऊहापोह? यादव बिचारा किरकोळीतला गुन्हेगार. वाधवा, वाझे किंवा मल्या-नीरव मोदी काय प्रकरण आहे? कल्पिता पिंपळे कायदा राबवायला गेल्या, तर त्यांची बोटे छाटली गेली. एक जबाबदार वरिष्ठ अधिकारी अधिकृतपणे बंदुका रोखून खंडणी वसुलीचे काम करीत होता.

त्याला कुठून आदेश मिळायचे ते त्यानेच कथन केलेले आहे. कायदा राबवणारे व कायदा धाब्यावर बसवणारे यातला नेमका फरक आपल्याला कसा समजणार आहे? यादव हातातला सुरा परजून वर्दळीच्या रस्त्यावर पिंपळे यांच्या अंगावर धावून गेला. परमबीर आपल्या अधिकृत अधिकार्‍यांना तशाच कामाला जुंपून विविध व्यावसायिकांच्या बाबतीत काय करीत होते? त्यांच्यावर नोंदल्या जाणार्‍या तक्रारींचे स्वरूप बघितले, तर प्रशासनातील अधिकार्‍यांत दडलेला यादव नावाचा फेरीवाला आपल्या दिसत नाही का? आज यादव नावाच्या सामान्य फेरीवाल्याने जे कृत्य रस्त्यावर केले, त्यापेक्षा परमबीर वा सचिन वाझे यांच्या कृत्यामध्ये कुठला फरक आहे? त्यापैकी एक अधिकृत शासकीय वर्दीतले आहेत आणि दुसरा गबाळा, सामान्य फेरीवाला आहे; पण दोघांच्या वर्तनामध्ये वा हेतूमध्ये तसूभर फरक आढळत नाही. त्यांच्यातला फरक क्‍वचित आपल्यासमोर येतो, जेव्हा त्यांना खेळवणारेच त्यात फसतात तेव्हा. अन्यथा वाझे, परमबीर स्कॉटलंड यार्डचे अद्वितीय अपूर्व अधिकारी असतात आणि अगदीच अतिरेकामुळे पकडले गेल्यावर यादव म्हणून आपल्यासमोर पेश केले जातात. आपल्यालाही असली नाटके व खळबळजनक बातमी आवडतच असते ना?

Back to top button