बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याची भूमिका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या स्वबळावर लढण्याच्या वक्तव्याचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या भूमिकेच्या विरोधात सदर व्यक्तव्य असल्याने काँग्रेस नेत्यांमधील मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात होताना दिसत आहे.
गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी बाळासाहेब थोरात शनिवारी शेगाव शहरात होते.
यावेळी पत्रकारांनी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडीत सहभागी पक्ष एकत्रित लढणार आहे.
महत्वाचे म्हणजे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस आगामी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे वारंवार सांगत आहेत.
मात्र, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी वेगळे वक्तव्य केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पटोले आणि थोरात वेगळा सूर लावत असल्याचे दिसत आहे.
या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोणती भूमिका जाहीर करतात. याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.
राहुल गांधींनी मंजुरी स्वबळाला दिली. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे.
राहुल गांधींशी झालेल्या भेटीत नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसला काम करण्याची मोठी संधी आहे, असे सांगितले होते. पटोलेंनी राज्यातील काँग्रेसच्या आगामी भूमिकेबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. अखेर त्यांनी स्वबळाला मंजुरी दिली होती. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. या दृष्टीने काँग्रेस स्बवळावर लढण्याची तयारी करत असल्याचे पटोलेंनी गांधींसोबत झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट केले होते.