२५० रुपयांच्या फी साठी शिक्षकाकडून मारहाण, १३ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

लखनौ : पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्रावस्ती जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलाला शाळेची २५० रुपयांची फी भरण्यास उशीर केल्याच्या कारणावरून शिक्षकाने बेदम मारहाण केली होती. त्यात मुलाचा मृत्यू झाला आहे. सदर मुलगा इयत्ता ७ वी मध्ये शिकत होता. बृजेश असे त्याचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी सिरसिया पोलिस स्टेशनमध्ये शाळेतील शिक्षक अनुपम पाठक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बृजेश ८ ऑगस्ट रोजी गावातील शाळेत गेला होता. तेथे त्याला शिक्षकाने मारहाण केली. पण उपचारादरम्यान १७ ऑगस्ट रोजी मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

शिक्षकाने मारहाण केल्याने मुलाच्या नाकातून रक्तस्त्राव झाला होता. तसेच त्याचा चेहरा सुजला होता. दरम्यान, १० दिवसांनी बुधवारी उशिरा बहराइचमधील सरकारी रुग्णालयात बृजेशचा मृत्यू झाला. मुलाच्या मूळ गावी चौलाही येथील पंडित ब्रह्मा दत्त शाळेत मारहाणीचा प्रकार घडला होता. श्रावस्तीचे एसपी अरविंद कुमार मौर्य यांनी सांगितले की, बृजेशच्या मृत्यूबद्दल त्याचे काका शिव कुमार यांनी तक्रार केली होती. त्या आधारे एफआयआर नोंद केला आहे.

पोलिसांकडील नोंद तक्रारीनुसार, ८ ऑगस्ट रोजी बृजेश शाळेतून जखमी अवस्थेत घरी परतला होता. फी न भरल्याबद्दल त्याच्या शिक्षकाने त्याला मारहाण केली. त्याला तात्काळ भिंगा येथील जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला बहराइच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते.

बृजेशच्या पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. डेप्युटी एसपी दर्जाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अशी माहिती एसपी मौर्य यांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियासह मोठ्या संख्येने जमा झालेल्या लोकांनी शाळेबाहेर चक्काजाम केला होता.

राजस्थानमध्येही अशीच घटना

राजस्थानमध्येही नुकतीच अशीच एक घटना घडली होती. जालोर येथील शाळेतील एका शिक्षकाने पाण्याच्या भांड्याला हात लावल्याच्या कारणावरून एका शाळकरी मुलाला मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला.

 हे ही वाचा :

Exit mobile version