अफगाणिस्तान : वीस वर्षांत उभारलेलं सगळं काही उद्ध्वस्त झालं! | पुढारी

अफगाणिस्तान : वीस वर्षांत उभारलेलं सगळं काही उद्ध्वस्त झालं!

गाझियाबाद; पुढारी वृत्तसेवा : अफगाणिस्तान येथून भारतात सुखरूप परतलेल्या नागरिकांच्या भावना उचंबळून आल्याचे चित्र हिंडन विमानतळावर दिसून आले. त्यातही विशेष म्हणजे अफगाणिस्तान मधील खासदार नरेंद्रसिंह खालसा यांना भावना अनावर झाल्या.

भारतीय लष्करी विमानाने आणलेल्यांमध्ये त्यांचाही समावेश आहे. ते सद्गदित होऊन बोलू लागले. ‘अफगाणिस्तानात गेल्या 20 वर्षांत आम्ही जे उभारले, ते सारे उद्ध्वस्त झाले’… त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हवाई दलाच्या विमानाने आलेल्या 168 जणांमध्ये 107 भारतीय आहेत. बाकीचे अफगाणी शीख आणि हिंदू आहेत. त्यात खासदार सिंह खालसा, अनारकली होनरयार आणि त्यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे. होनरयार आणि खालसा यांना तालिबान्यांनी शनिवारी विमानतळावरून ताब्यात घेतले होते.

हिंडन विमानतळावर उतरताच खालसा यांचे डोळे भरून आले. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. आम्ही मोठ्या जिद्दीने काम केले. वीस वर्षांत अफगाणिस्तानची बांधणी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सगळं उद्ध्वस्त झालं, असे ते म्हणाले.

याच विमानातून दिल्लीत परतलेल्या दीपन शेरपा यांनी अफगाणिस्तानातील भयंकर परिस्थितीची माहिती दिली. तालिबान्यांवर विश्वास ठेवता येत नाही. आम्ही भीतीच्या छायेखालीच जगत होतो. आता सुखरूप आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

तालिबान्यांनी घर जाळले

एका अफगाणी महिलेनेही भारताने आश्रय दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ती मुलगी आणि दोन नातवंडांसह आली आहे. तालिबान्यांनी माझे घर जाळले. या परिस्थितीत मला भारतीय बांधवांनी मदतीचा हात दिला. त्यामुळेच मी वाचू शकले, असे ती म्हणाली.

काबूल विमानतळावर चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्‍यू

दरम्यान, अफगाणिस्‍तानमध्‍ये तालिबान्‍यांनी सत्ता काबीज केल्‍यानंतर काबूल विमानतळावर प्रचंड तणाव आहे. देश सोडण्‍यासाठी हजारो नागरिक विमानतळावर गर्दी करत आहे. रविवारी विमानतळावर चेंगराचेंगरी झाली. यामध्‍ये अफगाणिस्‍तानमधील सात नागरिकांचा जणांचा मृत्‍यू झाला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

Back to top button