काबूल ; वृत्तसंस्था : घुसखोरी करून अफगाणिस्तान बळकावणार्या जहाल दहशतवादी संघटना तालिबान्यांचे सैतानी अत्याचार गेल्या पाच दिवसांपासून नागरिकांवर सुरूच आहेत. तालिबान्यांच्या क्रौर्यापासून कुणाचीही सुटका झालेली नाही. आता तर त्यांनी महिला आणि लहान मुलांनाही लक्ष्य केले आहे. वृत्तवाहिन्यांतील महिला निवेदकांना बंदी घालण्यात आली आहे. हजारा समुदायातील तरुण मुलींना विवाहासाठी बळजबरी केली जात आहे. त्यांच्या या क्रौर्यामुळे भयभीत झालेल्या मुलींना पालक काबूलकडे पाठवत आहेत.
काही धाडसी महिलांनी तालिबान्यांच्या विरोधात शस्त्रे हातात घेतली असून संघर्षाचा एल्गार पुकारला आहे. गेल्या 5 दिवसांत तालिबान्यांनी 40 पेक्षा जास्त नागरिकांना ठार मारले आहे.
अफगाणिस्तान मध्ये सत्ता हस्तगत केल्यानंतर शांततेची भाषा करणार्या तालिबानच्या 'कथनी आणि करणी'त मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार सुरू आहेत. पुरुषांच्या चेहर्याला काळे फासले जात आहे. त्यांना आसूडाचे फटके दिले जात आहेत. मारहाणीतून लहान मुलेही सुटलेली नाहीत.
तालिबानकडून नागरिकांमध्ये आपला धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रकार सुरू आहेत. काबूल विमानतळाबाहेर प्रतीक्षा करणार्या व्यक्तींना मंगळवारी टोकदार शस्त्रे, चाबूक, लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण करण्यात आली. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. मारहाणीत 12 नागरिक गंभीररीत्या जखमी झाले. तत्पूर्वी जे लोक देश सोडून जाणार असतील, त्यांना रोखले जाणार नाही, असे तालिबानने स्पष्ट केले होते. आता मात्र फक्त विदेशी नागरिकांनाच देशाबाहेर सोडले जात आहे. अफगाणिस्तानमधील जनतेला बाहेर जाऊ दिले जात नाही.
हेरात प्रांतात काही नागरिकांच्या तोंडाला काळे फासून त्यांच्या गळ्यात दोर बांधून रस्त्यांवरून फिरवल्याची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. एका तरुणीचा व्हिडीओही समोर आला आहे. त्यात ती अमेरिकन सैन्याकडे मदतीची याचना करताना दिसत आहे.
याशिवाय ठिकठिकाणी गस्त घालणार्या तालिबानी दहशतवाद्यांकडून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची उदाहरणेही समोर येत आहेत.
अफगाणिस्तानातील हजारा समाजाच्या मुलींशी तालिबानी जबरदस्तीने विवाह करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे हा समाज सध्या प्रचंड दहशतीखाली आहे. हजारा हा शिया मुस्लिमांचा एक समूह आहे. अफगाणिस्तानातील एकूण लोकसंख्येच्या केवळ दहा टक्के इतकीच त्यांची संख्या आहे. या समाजातील नेत्यांच्या मूर्तींचीही तालिबान्यांनी तोडफोड केली होती.
तालिबान्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी महिला लहान मुलांना घेऊन विमानतळाकडे धाव घेत आहेत. यात एकीकडे तालिबानी दहशतवादी आणि दुसरीकडे अमेरिकी आणि ब्रिटीश सैनिक यांचा पहारा यातून विमानतळावर जाताना त्यांची दमछाक होते. अशावेळी लहान मुलांना काटेरी तारांच्या कुंपणाच्या बाहेर फेकले जाते. मात्र सैनिक त्यांना शिताफीने झेलून मुलांचे प्राण वाचवित असल्याचे दृष्य विचलीत करणारे होते.