अर्थव्यवस्थेला चालना मिळणार | पुढारी

अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

डॉ. वसंत पटवर्धन

गुरुवारी 19 ऑगस्ट रोजी शेअर बाजार बंद होताना 55,629 अंकांवर होता. तर निफ्टी 16,568 वर होता. गेल्या आठवड्यात मोहरमच्या दिवसासाठी शेअरबाजार बंद होता. त्यामुळे व्यवहार फक्‍त 4 दिवसच झाले. शेअरबाजार सध्या स्थिरावला आहे आणि निर्देशांक हळूहळू पण निश्‍चितपणे वर जात आहे. या लेखमालेत सर्वसाधारणपणे ज्या शेअर्समधील हालचाल प्रामुख्याने बघतो, त्यांचे भाव गुरुवारी बाजार बंद होताना खालीलप्रमाणे होते.

गेह 2310 रुपये, जिंदाल स्टील (हिस्सार) 278 रुपये, मन्‍नापुरम फायनान्स 165 रुपये, बजाज फायनान्स 6544 रुपये, फिलिप्स कार्बन 238 रुपये, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 106 रुपये, जे कुमार इन्फ्रा 211 रुपये, रेप्को होम्स 316 रुपये, जिंदाल स्टील 406 रुपये, मुथूट फायनान्स 1471 रुपये, के टू आय इंडस्ट्रीज 721 रुपये, लार्सेन टुब्रो 1631, लार्सेन टुब्रो इन्फोटेक 4940 रुपये, इंटलेक्ट 675 रुपये, ग्राफाईट 651 रुपये, हिंदुस्थान पेट्रोलियम 253, एसबीआय 419 रुपये, स्ट्रील स्ट्रीप्स व्हील्स 170 रुपये, पीएनबी हाऊसिंग 680 रुपये, बजाज फिनसर्व्ह 14,961 रुपये.

जुलैमध्ये घाऊक महागाई 11.16 टक्क्यांनी खाली होता. त्याच्या आधी जून महिन्यात हा दर 12.7 टक्क्याने वर गेला होता. घाऊक महागाई कमी होण्याचे मुख्य कारण खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली घट हे होते. पावसाळा आता जवळजवळ निम्म्याने संपला आहे. तो समाधानकारक असल्यामुळे महागाई कमी होत राहील. दर दोन महिन्यांनी रिझर्व्ह बँक रेपो दराचा विचार करीत असते. म्हणजेच फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर हे ते महिने असतात. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपले द्वैमासिक धोरण जाहीर केले. त्यावेळी रेपो दर व रिव्हर्स रेपो दर यात काहीही बदल केला गेला नव्हता. सध्या रेपो दर 4 टक्के असून रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आहे. याचाच अर्थ, बाजारातील द्रवता स्थिरावलेली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीताराम बँकांच्या प्रमुखांची बैठक 25 ऑगस्ट रोजी घेणार आहेत. कोरोनामुळे आर्थिक उत्पादन वाढत नसल्याने, त्या बँकांनी कर्जवाढीवर भर द्यावा आणि मरगळेल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, असे कदाचित सांगतील.

केंद्र सरकारच्या अथक परिश्रमांमुळे सार्वजनिक बँकांची थकीत कर्जे 31 मार्च 2021 अखेर कमी होऊन 6.17 लाख कोटी रुपयांवर आली आहेत. 31 मार्च 2020 रोजी एकूण थकीत कर्जे 6.78 लाख कोटी रुपयांवर होती. 31मार्च 2019 रोजी ही कर्जे 7.40 लाख कोटी रुपयांवर होती.

देशातील तरुण वर्ग आता गुंतवणूक तसेच अन्य अर्थव्यवहार यात जास्त जागरूक होत आहे. हे एक चांगले चिन्ह आहे. कोरोनाचे संकट बघितल्यावर तरुण वर्ग आपल्या भविष्यकाळाबद्दल जास्त जागरूक होत आहे.

बँकांकडील कर्जात फार वाढ सध्या होत नाही. पण ठेवी मात्र वाढत आहेत. त्यामुळे कर्जाच्या आकड्यात जास्त वाढ होण्यासाठी बँका गृहकर्जात वाढ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या गृहकर्जे 8 टक्क्यांच्या आसपास मिळत आहेत. भारतातील तरुण वर्ग नोकरी लागल्या नंतर स्वत:चे घर असण्याबद्दल गांभीर्याने विचार करत आहेत. त्यांना जास्त प्रोत्साहन देण्यासाठी बँका आता प्रक्रिया शुल्क लावत नाहीत. स्टेट बँकेने याबाबत जास्त पुढाकार घेतला आहे.

गृहकर्जे आणि वाहनकर्जे याबाबत बँकांकडून तरुणाईला जास्त प्रोत्साहन दिले जात आहेे. ही गृहकर्जे 15 ते 25 वर्षांपर्यंतच्या दीर्घ कालावधीसाठी द्यावी लागतात. पण वाहन कर्जांची मुदत 5 ते 10 वर्षे असते. गृहकर्जे व वाहनकर्जे वाढल्यास आपोआपच नव्या घरबांधणीला व वाहनांच्या नवीन मॉडेल्सना उत्तेजन मिळते. त्यामुळे रोजगारात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. घरबांधणीसाठी सिमेंट, लोखंड, चुना, रंग इ. क्षेत्रांत रोजगार वाढतात.

वरील सर्व पार्श्वभूमी जरी आश्वासक असली तरी आपल्या जवळच असलेल्या अफगाणिस्थानमधील राजकीय अस्थिरता भारताला सतत डोळ्यासमोर ठेवावी लागणार आहे. अफगाणिस्थानमध्ये जरी तालिबान्यांनी सत्ता स्थापन केली असली तरी भारताला आपल्याकडून धक्‍का बसणार नाही, याबाबत तालिबान्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

भरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर भूमिका घेण्याबद्दल प्रसिद्ध असल्यामुळे तालिबानला कोणतेही पाऊल उचलण्याबद्दल आधी 10 वेळा विचार करावा लागेल. सन 2000 ते 2020 पर्यंत अफगाणिस्थानमध्ये अमेरिकन सैन्य होते. पण आता त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागत असल्यामुळे अमेरिकेने अफगाणिस्थानमधून आपले सैन्य काढून घ्यायला सुरुवात केली आहे, याची जाणीव भारताला ठेवावी लागेल.

मुंबई शेअरबाजारावर नोंद झालेल्या आणि निर्देशांक काढण्यासाठी विकल्या गेेलेल्या कंपन्यांवरच गुंतवणूकदारांनी आपले लक्ष केंद्रित करून पुन्हा बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नवीन फ्युओर, फिलीप कार्बन, स्टेट बँक ऑफ इंडिया, मयूर युनिकोटर्स, डालमिया भारत शुगर, लार्सन टूब्रो इन्फोटेक, लार्सेन टूब्रो यावर भर घ्यायाला हवा. इतर अन्य ठिकाणी तात्पुरती झळाळी दिसली तरी जे चकाकते ते सर्वच सोने नसते आणि जड-जवाहिर नसते, हे लक्षात ठेेवायला हवे.

आपण कष्ट, परिश्रम व घामाने मिळवलेला पैसा कटाक्षाने व विचारपूर्वक गुंतवायला हवा.

Back to top button