काबूल; पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानची प्रसिद्ध पॉप स्टार अर्याना सईद हिने देश सोडला आहे. अर्याना सईद हिने काबूलमध्ये अमेरिकेचे विमान पकडून तालिबानने कब्जा केलेल्या अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करताच शरियत कायदा लागू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे उदारमतवादी आणि आधुनिक विचारसरणीचे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हे लोक देश सोडून जाताना दिसत आहे.
अर्यानाने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपण देश सोडून जात असल्याची माहिती दिली. अमेरिकेच्या विमानात ती बसलेली दिसत आहे. तिने आणखी एक फोटो शेअर केला असून त्यात ती मास्क घालून बसलेली दिसत आहे.
"भयाच्या सावटात मी रात्री घालवल्या. पण अखेर सुखरूप आणि जिवंत आहे. मी दोहा, कतारला पोहोचले आहे आणि इस्तंबूलला जाण्यासाठी फ्लाइटची वाट पाहत आहे. मला घर मिळाल्यानंतर आणि मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर माझ्याकडे शेअर केल्यासाठी अनेक गोष्टी आहेत. कृपया सुरक्षित रहा आणि कृपया एकसंध राहा!" अशी भावनिक पोस्ट अर्यानाने केली आहे.
याच दरम्यान अफगाणि चित्रपट दिग्दर्शक हसन फाजिली यांनी आपल्या देशवासियांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी विशेषतः कला आणि संस्कृतीच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
दररोज अफगाणिस्तानातून हजारोंच्या संख्येने लोक देश सोडून जात आहेत. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर विमानाच्या पंख्याला लटकून जाणाऱ्या तिघांचा खाली कोसळून मृत्यू झाला होता.