‘लिव्ह इन रिलेशन’मधील अपत्याचाही मालमत्तेत वाटा | पुढारी

‘लिव्ह इन रिलेशन’मधील अपत्याचाही मालमत्तेत वाटा

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : लग्न न करता सोबत राहाणार्‍या महिलेच्या मुलांचाही पित्याच्या मालमत्तेत वाटा असतो, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एक महिला आणि एक पुरुष दीर्घकाळपर्यंत एकत्रित राहाणार असतील तर त्यांचे परस्परांतील नाते पती-पत्नीसारखेच मानले जाईल आणि या नात्यातून जन्मलेल्या बाळाचा त्याच्या जैविक पित्याच्या मालमत्तेवर हक्कही असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एका युवकाला पित्याच्या मालमत्तेत वाटा नाकारण्यात आला होता. त्याच्या मातेचे आणि पित्याचे रितसर लग्न झालेले नव्हते, हे कारण त्यामागे नमूद देण्यात आले होते. केरळ उच्च न्यायालयानेही या प्रकरणात मुलाच्या बाजूने निकाल दिला नव्हता. मुलाच्या आई-वडिलांचा विवाह झालेला नसल्याने मुलाला वाटा देता येणार नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला होता.

त्याविरुद्ध मुलाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. लग्न झालेले नसले तरी मुलगा कुणाचा आहे, हे डीएनए चाचणीतून आता सिद्ध होते. दीर्घकाळ लग्नाशिवाय एकत्र राहिलेल्या दाम्पत्याचा अमुक एक मुलगा आहे, हे डीएनए चाचणीने सिद्ध झाले तर अशा मुुलाचा संपत्तीतील हक्क हिरावून घेता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

‘लिव्ह इन रिलेशन’बद्दल कायदा काय सांगतो?

2010 मध्ये सुप्रीम कोर्टाने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला मान्यता दिली. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला ‘कौटुंबिक हिंसा 2005 चे कलम 2 (फ)’च्या कक्षेतही आणले. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये पती-पत्नीप्रमाणेच राहावे लागेल, फक्त एकत्रित राहाण्याची कालमर्यादा निश्चित नसेल.

Back to top button