देशात १८ वर्षांवरील लसीकरण मोहिमेचा फज्जा | पुढारी

देशात १८ वर्षांवरील लसीकरण मोहिमेचा फज्जा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

१८ वर्षांवरील नागरिकांचे १ मेपासून लसीकरण केले जाण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असली तरी पुरेशा लसींअभावी या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांनी १८ वर्षांवरील लसीकरण होणार नाही असे जाहीर केले आहे. कोरोनाची दुसरी लाट गंभीर स्वरुप धारण करत असताना असा निर्णय घेणे धोक्याचे ठरू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वाचा : कोल्हापुरात लसीकरण केंद्रात महिला कर्मचार्‍यास मारहाण

देशातील लस उत्पादक कंपन्या सीरम इन्सिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन कंपन्यांनी डोस देण्यास असमर्थता दर्शविली आहे. याबाबत बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही लसीकरणाबाबत असमर्थता दर्शविली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील लसीकरण करणे अशक्य असल्याचे ते म्हणाले. 

वाचा : परमबीरविरुद्धच्या चौकशांच्या स्थगितीस नकार 

गुजरात सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला कोव्हिशिल्ड लसीच्या २ कोटी आणि भारत बायोटेकच्या ५० लाख डोसेसची ऑर्डर दिली आहे. मात्र हे डोस सध्या उपल्ध होणार नाहीत. अंदाजे १५ दिवसांनंतर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाईल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. 

दिल्ली सरकारकडेही लसी उपलब्ध नसल्याने लसीकरणाबाबत असमर्थता दर्शविली आहे. लस उपलब्ध होताच, पुरवठा आपल्याला केला जाईल, असे कंपन्यांनी कळविल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. तामिळनाडू सरकारनेही दीड कोटी डोसेसची ऑर्डर दिला आहे. पण त्यांनाही कंपनीने डोस देण्यास असमर्थता दर्शविली आहे. जूनपर्यंत ही लस उपलब्ध होणार नाही, असे एका कंपनीने सांगितले.  त्यामुळे १ मेपासून लसीकरण होणार नाही.

पंजाबसाठी सध्या १० लाख डोसची गरज आहे. मात्र, जोपर्यंत डोस मिळत नाही तोपर्यंत लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करणार नाही, असे पंजाब सरकारचे आरोग्यमंत्री बलबीर सिंग यांनी सांगितले. 

राजस्थान सरकारकडेही लसीचा तुटवडा असून १५ मेपर्यंत लस उपलब्ध होणार नाही, असे लस उत्पादक कंपन्यांनी सांगितलं आहे, अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी दिली.

लस पुरवठा नियमित केल्याचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा दावा

लसीकरण मोहिमेतील राज्यांच्या कामगिरीनुसार लसींचे डोसेस  दिले जात आहेत. आम्ही राज्यांना १६ कोटी डोसेसचा पुरवठा केला आहे. त्यापैकी १५ कोटी डोस दिले आहेत. अजूनही १ कोटी डोसेस शिल्लक आहेत. आणखी काही लाख डोसेस येत्या २ ते ३ दिवसांत पुरवले जातील. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून लसीच्या पुरवठ्यात एक दिवसाचाही खाडा झालेला नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. 

वाचा : लसीच्या किमतीत हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार

Back to top button