मेच्या मध्यापर्यंत ऑक्सिजनचे संकट कमी होणार | पुढारी

मेच्या मध्यापर्यंत ऑक्सिजनचे संकट कमी होणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

मे महिन्याच्या मध्यापर्यंत मेडिकल ऑक्सिजनचे संकट कमी होण्याचा अंदाज असून येत्या काही दिवसात ऑक्सिजनचे उत्पादनही २५ टक्क्यांनी वाढणार असल्याची माहिती ऑक्सिजन निर्मिती उद्योगांतील जाणकारांनी दिली आहे. कोरोना संकटात ऑक्सिजनअभावी आतापर्यंत असंख्य लोकांचा मृत्यू झाला आहे.

अधिक वाचा : ‘लस मिळाली नाही तर आरोग्यमंत्री राजीनामा देतील का?’

देशात ऑक्सिजनचे पुरेसे उत्पादन होत असले तरी मेडिकल ऑक्सिजन हव्या त्या प्रमाणात तयार होत नाही. त्यातच रुग्णांची प्रचंड वेगाने वाढत असलेली संख्या आणि पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे स्थिती खराब बनली आहे. मेडिकल ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन देशाच्या विविध भागात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प सुरु झाले आहेत. शिवाय पुरवठ्यातील अडथळे दूर करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. ऑक्सिजन उत्पादनाशी निगडित वैद्यकीय उपकरणे मोठ्या संख्येने विदेशातून मागविली जात असल्याने पुढील काही दिवसात मेडिकल ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल व ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू ओढवणार नाही, अशी आशा ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा : …तर दिल्लीत रस्त्यांवर मृतांचा खच पडेल, आप आमदाराकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी

ऑक्सिजनच्या अभावामुळे मुंबई, दिल्ली, लखनौ, इंदूर आदी प्रमुख शहरासह विविध राज्यातील कित्येक रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या असंख्य रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाईक ठिकठिकाणी धावाधाव करत असल्याचे दृष्य सध्या देशात पाहण्यात येत आहे. देशात लिंडे इंडिया कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. मागील काही दिवसात मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीत आठ पटीने वाढ झाली असल्याची माहिती या कंपनीचे अधिकारी मोले बॅनर्जी यांनी दिली.

अधिक वाचा : माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे निधन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची इतक्या प्रचंड प्रमाणात गरज लागेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती, असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. पुढील महिन्यापासून लिंडे इंडिया आणि प्रॅक्सएअर यांच्याकडून दिवसाला ९ हजार टन इतक्या ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. देशाच्या पूर्व भागात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. तेथून मागणी असलेल्या उत्तर आणि पश्चिम भारतात मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मे च्या मध्यापर्यंत परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आलेली असेल, अशी आशा बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

Back to top button