राज्याला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा! | पुढारी

राज्याला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा!

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

रेमडेसिवीर इंजेक्शनची सर्व राज्यांमध्ये असलेली गरज लक्षात घेऊन, त्याची पुरेशी उपलब्धता असावी, या हेतूने, सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कुप्यांचे 16 मे पर्यंतचे वितरण पूर्ण केले आहे, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी दिली. मंत्रालयातर्फे राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना 21 एप्रिल ते 9 मे 2021 पर्यंतचे वितरण करण्यात आले आहे. याचे पुरवठा वितरण आदेश 1 मे रोजी जारी करण्यात आले होते. हाच नियोजन आराखडा आता 16 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रास या कालावधीसाठी सर्वाधिक 11 लाख 56 हजार कुप्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.

अधिक वाचा : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा अन् एम्सने केला तातडीने खुलासा!

रेमडेसिवीरचा साठा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या निश्चित कोट्यानुसार वितरित केला जाईल. त्यानंतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्याच्या वाटपावर देखरेख ठेवावी. सरकारी तसेच खासगी रुग्णालयात त्याचा अयोग्य वापर होत नाही ना याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी विपणन कंपन्यांकडे रेमडेसिवीरची ऑर्डर नोंदवली नसेल तर त्वरीत पुरेशी खरेदी ऑर्डर नोंदवावी असा सल्ला देखील केंद्रीय मंत्रालयाने दिला आहे. राज्यांना ज्या प्रमाणात औषधसाठा हवा आहे, तेवढा साठा मिळवण्यासाठी संपर्क अधिकाऱ्याशी समन्वय ठेवावा. त्यासोबतच यासाठी राज्यातल्या वितरण खाजगी कंपन्यांशी देखील संपर्क साधता येईल, असे मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा : कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा धोका; तुम्हाला ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

महाराष्ट्राकडे सध्या 4 लाख 84 हजार 287 लसीच्या मात्रा शिल्लक

केंद्र सरकारने आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 17 कोटी 35 लाखांहून जास्त (17,35,07,770)  मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरविल्या आहेत. आज सकाळी 8 वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार वाया गेलेल्या मात्रांसह आतापर्यंत एकूण 16,44,77,100 मात्रांचा वापर झाला आहे. महाराष्ट्राकडे सध्या 4 लाख 84 हजार 287 मात्रा शिल्लक असून लवकरच 1 लाख 50 हजार मात्रांचा पुरवठा केला जाणार आहे.

अधिक वाचा : चारवेळा कोरोना झाला, दोन वेळा प्लाझ्मा दान!

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांकडे अद्याप कोरोना  प्रतिबंधक लसीच्या  90 लाखांहून जास्त (90,30,670) मात्रा वापरण्यासाठी शिल्लक आहेत. राज्यांनी संरक्षण दलांना पुरविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांची निश्चित आकडेवारी अजून प्राप्त झाली नसल्याने, काही राज्यांमध्ये त्यांना केंद्राकडून पुरविण्यात आलेल्या मात्रांपेक्षा वाया गेलेल्या मात्रांसह अधिक मात्रा त्यांनी वापरल्याचे दिसून आले आहे. तसेच, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना आधी पुरवण्यात आलेल्या मात्रांखेरीज येत्या 3 दिवसांत 10 लाखांहून अधिक (10,25,000) मात्रा पुरविण्यात येणार आहेत.

Back to top button