सीएम ममतांकडून पोलिस खात्याची झाडाझडती! | पुढारी

सीएम ममतांकडून पोलिस खात्याची झाडाझडती!

कोलकाता : पुढारी ऑनलाईन 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर लगेचच तब्बल २९ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. तर कुचबिहारच्या पोलिस अधीक्षकांना निलंबित केले आहे. हे सर्व अधिकारी निवडणूक आयोगाने तैनात केले होते. 

वाचा : गोव्यात कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी 

प. बंगालची निवडणूक जाहीर होताच येथील बहुतांश पोलिस अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाने बदल्या केल्या होत्या तर काहींना वेटिंगवर ठेवले होते. हे अधिकारी तैनात करताना ज्या अधिकाऱ्यांना हटविण्यात आले त्यांना पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती दिली. तर कूचबिहारचे अधीक्षक देबाशिष धर यांना निलंबित केले आहे. 

कूचबिहार येथील सीतलकुची येथे १० एप्रिल रोजी एका मतदान केंद्रावर झालेला हल्ला परतवून लावताना सीआयएसएफ जवानानी केलेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. धर यांच्या जागी के. कन्नन यांची नियुक्ती झाली आहे. कन्नन यांना निवडणूक आयोगाने वेटिंगवर ठेवले होते.

वाचा : किरण खेर यांची तब्येत बिघडली? अनुपम खेर म्हणाले…

ममता यांनी ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत त्यात पोलिस महासंचालक वीरेंद्र, अतिरिक्त महासंचालक (कायदा सुव्यवस्था) जावेद शमीम आणि सुरक्षा महासंचालक विवेक सहाय यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने वीरेंद्र यांच्याजागी नीरज नयन पांडे यांना महासंचालक करण्यात आले. त्यांना अग्निशमनचे महासंचालक करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांना अपघात झाल्यानंतर विवेक सहाय यांना कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने पदावरून हटविले होते.

वाचा : राज्यातील कोरोना विरोधातील लढ्याचे पीएम मोदींकडून कौतुक!

Back to top button