काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर  | पुढारी

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लांबणीवर 

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेसच्या कार्यकारणीची आज ( दि. १० ) दिल्ली येथे बैठक पार पडली. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. कोरोनाचा संकटकाळ पाहता निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकारणीतील अनेक नेत्यांनी मागणी केल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 

काँग्रेसच्या निवडणूक समितीने यापूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या मतदानासाठी २३ जून ही तारीख निश्चित केली होती. काही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने अध्यक्ष पदासाठी नामांकन भरण्याची अंतिम तारीख ही ७ जून ठेवण्यात यावी अशी सुचना केली होती. 

पण, पक्षाची निर्णय घेणारी सर्वोच्च समिती काँग्रेस कार्यकारणीने आजच्या बैठकीत कोरोनाच्या संकटकाळात निवडणूक पुढे ढकलण्यात यावी असे मत मांडले. त्यानंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकमताने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

२०१९ च्या लोकसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद हा वादाचा मुद्दा बनला आहे. पाठोपाठच्या निवडणुकांमध्ये पराभव झालेल्या काँग्रेससाठी यंदाची अध्यक्षपदाची निवडणूक ही गांधी घराण्याची कसोटी पाहणारी ठरणार आहे. 

राहुल गांधी यांनी २०१७ मध्ये सोनिया गांधी यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रे आपल्या हातात घेतली होती. पण, त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा निराशाजनक निकाल लागल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आपल्या राजीनाम्यात गांधी घराण्यातील व्यक्ती सोडून दुसरा कोणी तरी काँग्रेसचा अध्यक्ष व्हावा अशी सुचना केली होती. पण, पक्षाला असा दुसरा कोणताही चेहरा मिळाला नाही अखेर सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्षपद सांभाळण्याची विनंती करण्यात आली. 

Back to top button