Cyclone Tauktae : संध्याकाळपर्यंत ‘ताउक्ते’ चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार! | पुढारी

Cyclone Tauktae : संध्याकाळपर्यंत 'ताउक्ते' चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार!

नवी दिल्ली ः पुढारी ऑनलाईन 

केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांच्या समुद्रकिनारी रविवारी थैमान घालणारे ‘ताउक्ते’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर  पाऊस, वारे आणि समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळत आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडे जमिनदोस्त झाली, तर या चक्रीवादळात ६ लोकांचा मृत्यूदेखील झाला. विजेचे खांबही उन्मळून पडले आणि घरांचे नुकसानदेखील प्रचंड प्रमाणात झाले आहे. 

वाचा ः ठाणे : वादळाने १३ ठिकाणी वृक्ष उन्मळले

भारतीय हवामान खात्याने सांगितले की, “ताउक्ते हे चक्रीवाद आणखी तीव्र होऊ शकते. त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत हे वादळ गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर धडकू शकते. मंगळवारपर्यंत पोरबंदर आणि भावनगर जिल्ह्यातील महुवा दरम्यान असलेल्या किनारी पोहचू शकते. त्याचबरोबर आजपासून पुढील दोन दिवसांमध्ये मध्यप्रदेशच्या पश्चिम भागांमध्ये ढगांच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस पडू शकतो. तर, ४५-५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात”, असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. 

वाचा ः ताउक्ते चक्रीवादळाने उडविली रायगडकरांची झोप; घरांचे नुकसान, वीजपुरवठा खंडित 

आतापर्यंत मुंबईमध्ये या चक्रीवादळामुळे वेगाने वारे वाहू लागल्यामुळे वृक्षं उन्मळून पडली आहेत. तर, मुंबईशिवाय उत्तर कोकण, ठाणे, पालघर या भागांतही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये पहाटे ३ वाजून ३७ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले आहेत ते ३.८ रिश्टल स्केल इतकी त्याची तीव्रता होती. 

Back to top button