कोरोना अँटिबॉडीज् शोधणारे भारतीय उपकरण   | पुढारी

कोरोना अँटिबॉडीज् शोधणारे भारतीय उपकरण  

बंगळूर : वृत्तसंस्था

येथील भारतीय विज्ञान शिक्षण संस्थेतील वैज्ञानिकांनी कोरोनाच्या अँटिबॉडीज् तपासण्यासाठीचे एक उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या साहाय्याने कोरोनामुळे शरीरात तयार झालेल्या अँटिबॉडीज्ची स्थिती जाणून घेता येणार आहे.

‘सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, ‘पॅथशोध हेल्थकेअर कंपनी’ आदींनी मिळून हे इलेक्ट्रो-केमिकल यंत्र तयार केले आहे. अशा स्वरूपाचे भारतात विकसित झालेले हे पहिलेच यंत्र असल्याचे सांगण्यात येते. ‘आयसीएमआर’ने या यंत्राच्या विक्रीला परवानगी दिली आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यांत हे उपकरण बाजारात येणार आहे.

यंत्रामुळे शरीरातल्या कोरोनाच्या अँटिबॉडीज् सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरही तपासता येतील. त्यासाठी रक्‍त किंवा रक्‍तघटकाची तपासणी करावी लागेल. रक्‍ताच्या नमुन्याच्या आधारे या अँटिबॉडीज् तपासता येतील. सध्या दर महिन्याला एक लाख यंत्रे उत्पादित करता येतील, इतकी कंपनीची क्षमता आहे. यंत्रासोबत चाचण्यांसाठीच्या स्ट्रिप्सही मिळतील. स्ट्रिप्समुळे अँटिबॉडीज्चे प्रमाण कळेल. चाचणीचा निष्कर्ष यंत्राच्या स्क्रीनवर लगेचच पाहायला मिळेल, असे ‘पॅथशोध’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक विनय कुमार यांनी सांगितले. 

यंत्रात असलेल्या चिपमध्ये एक लाखांहून अधिक चाचण्यांचे निष्कर्ष साठवून ठेवता येऊ शकतात, हे या यंत्राचे वैशिष्ट्य आहे. याला टचस्क्रीन डिस्प्ले, रिचार्ज करता येणारी बॅटरी, स्मार्टफोनसोबत जोडण्यासाठी ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा, स्टोअरेज अशा अत्याधुनिक सुविधाही त्यात आहेत.

टेस्टही द‍ृष्टिपथात!

‘पॅथशोध’ आता याच यंत्रावर ‘रॅपिड अँटिजेन टेस्ट’ कशी करता येईल, याबद्दल संशोधन करते आहे. याबाबत आम्ही यशाच्या अगदी जवळ आहोत, असे ‘पॅथशोध’कडून सांगण्यात आले. म्हणजेच नजीकच्या काळात याच यंत्राच्या मदतीने कोरोनाची लागण झाली की नाही, याची तपासणीही करता येणार आहे.

Back to top button