किरकाळ कारणावरून पोलिसांनी ठोकले हातात खिळे; उत्तर प्रदेशातील क्रौर्य | पुढारी

किरकाळ कारणावरून पोलिसांनी ठोकले हातात खिळे; उत्तर प्रदेशातील क्रौर्य

बरेली : वृत्तसंस्था

कोरोना काळात उत्तर प्रदेश पोलिसांच्या क्रौर्याने सर्व सीमा पार केल्या असून बरेलीत तर या क्रौर्याचा कहर झाला. मास्क लावण्यावरून वाद विकोपाला गेला आणि  बारादरी पोलिसांनी युवकाच्या हातापायांत चक्‍क खिळे ठोकले.  

माध्यमांनी स्वत: या घटनेची खातरजमा केली असता रंजीत नावाच्या या युवकाच्या हातापायांत खिळे ठोकलेले आढळले. रंजीतच्या आईने (शीलादेवी) सांगितले, की बुधवारी रात्री रंजीत घराबाहेर बसलेला असताना पोलिस आले व मास्कवरून वाद घालू लागले. शेवटी रंजीतला पोलिस ठाण्यात नेऊन त्याच्या हातापायांना खिळे ठोकले. वरिष्ठ पोलिस अधिकारी रोहित सजवाण यांनी  मात्र सांगितले की, गुन्हा दाखल झाल्याने अटक होऊ नये म्हणून त्याने स्वत:च स्वत:च्या हातापायांना खिळे ठोकले.

अन्य एका घटनेत मोहम्मदाबाद येथील युवकाला पोलिसांनी रस्त्यावरून फरफटत पोलिस ठाण्यात नेले. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. 

दुसरीकडे पोलिस अधिकारी मृत्युंजय कुमार यांनी लवकुश, शिवाकांत, राहुल, विनय आणि विपीन तिवारी या युवकांना पोलिस कोठडीत डांबून रात्रभर मारहाण केल्याचीही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. मृत्युंजय कुमार यांनी सांगितले, हे सर्व दारू प्यायलेले होते आणि पोलिसांना शिव्या देत होते. मऊ नावाच्या शहरात पोलिसांनी एका युवकाला रस्ताभर लाथा-बुक्क्यांनी, दांडक्याने मारहाण करत पोलिस ठाण्यात नेल्याचा विषयही चर्चेत आला आहे. 

 

Back to top button