लस उत्पादनाचा पाया नेहरूंनी घातला!  | पुढारी

लस उत्पादनाचा पाया नेहरूंनी घातला! 

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा ; काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कोरोनावरील लसीकरणावरून पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लस संकटाला जबाबदार कोण, अशा शीर्षकाखाली त्यांनी सोशल मीडियात पोस्ट लिहून देशातील लस उत्पादनाचे श्रेय पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंना दिले आहे. 

प्रियाकांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1948 मध्ये चेन्नईत लस उत्पादनाचे युनिट आणि 1952 मध्ये पुण्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था स्थापन करून भारताच्या लसीकरण कार्यक्रमाला मोठे बळ दिले होते. आम्ही प्रयत्नपूर्वक देवी, पोलिओ या आजारांना मात दिली. आज भारत जगातील सर्वात मोठा लस उत्पादक आहे. त्यामुळेच देशातील नागरिकांना लस मिळेल हा विश्वास होता. मात्र, देशात पंतप्रधानांनी लसीला वैयक्तिक प्रचाराचे साधन बनवले. त्यामुळे आपल्या देशाला लस दान घ्यावी लागत आहे आणि लसीकरणात आपण कमकुवत देशांच्या रांगेत आहोत. हे कशामुळे झाले? याला जबाबदार कोण?

भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. यातील केवळ 11 टक्के लोकांना पहिला डोस तर 3 टक्के लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. मोदींनी लस महोत्सवाची घोषणा केल्यानंतर लसीकरणात 83 टक्के घट झाली. याला जबाबदार कोण?

अनेक देशांनी त्यांच्या लोकसंख्येच्या कित्येक पट लसींची मागणी नोंदवली आणि मोदी सरकारने पहिली मागणी नोंदवली केवळ 1 कोटी 60 लाख डोसची. जानेवारी ते मार्च काळात 6 कोटी 50 लाख डोस परदेशात पाठवले. याच काळात भारतात 3 कोटी 50 लाख लोकांना लसीकरण केले. 1 मे पासून 18 वर्षांवरील लसीकरणाची घोषणा केली; पण लसींची ऑर्डर नोंदवली फक्त 28 कोटी. यातून केवळ 14 कोटी लोकांचे लसीकरण होईल. भारतीयांना कमी लसीकरण करून परदेशात जास्त लस का पाठवली गेली? असा सवालही प्रियांकांनी केला आहे. 

 

Back to top button