नीरज चोपडा (Neeraj Chopra) : रोड मराठे हरियाणात कसे गेले? दहा मुद्दे

नीरज चोपडा (Neeraj Chopra) : रोड मराठे हरियाणात कसे गेले? दहा मुद्दे
Published on
Updated on

बाळासाहेब पाटील, पुढारी ऑनलाईन: रोड मराठा हे नाव सध्या खूप चर्चेत आहे ते नीरज चोपडा (Neeraj Chopra)  याच्यामुळे. नीरजने (Neeraj Chopra) सुवर्णपदक पटकावल्यानंतर तो रोड मराठा आहे, असे सांगितल्यानंतर जातीवरून मतमतांतरेही व्यक्त होत आहेत.

२५७ वर्षे ओळख नाही

परंतु २५७ वर्षे आपली ओळख शोधण्यासाठी धडपडणाऱ्या या समाजाला रोड मराठा ही ओळख मिळाली.

त्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांचे नाते थेट महाराष्ट्राच्या मातीशी असल्याने अनेकांना महाराष्ट्राचे लोक भेटले की, त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहतात.

ही ओढ मातीची आणि त्यांच्या पूर्वाश्रीमीच्या इतिहासाची आहे. हे रोड मराठे हरियाणात कसे गेले? त्यांना ओळख कशी मिळाली?

महाराष्ट्राशी त्यांचे नाते असणाऱ्या खुणा कोणत्या? हेआपण जाणून घेणार आहोत.

१. पानिपतचे युद्ध :

१४ जानेवारी, १७६१ रोजी संक्रातीदिवशी पानिपतच्या युद्धाचा निकाल लागला. जवळपास ५० हजार मराठा सैनिकांचा बळी गेला. दीड लाखांची फौज घेऊन सदाशिवभाऊ पेशवे पानिपताकडे गेले होते.

यात लढाऊ सैनिकांची संख्या दीड लाख नसली तरी कुटुंबकबिला आणि व्यापारी, यात्रेकरूही मोठ्या संख्येने होते.

अहमदशहा अब्दाली हा भारतात केवळ संपत्ती लुटण्याच्या आमिषाने आला होता असेही काही इतिहास संशोधक सांगतात.

या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांच्या फौजेत महाराष्ट्रातील अनेक घराणी सहभागी होती.

असे म्हणतात की, या फौजेत महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील एक व्यक्ती होता.

२. पराभवानंतर परागंदा:

याबाबत इतिहास संशोधक आणि हिंदीचे प्राध्यापक डॉ. वसंतराव मोरे सांगतात, पानिपतच्या युद्धात हरल्यानंतर एक टोळी जंगलात लपून बसली होती.

ते गावात येताना त्यांनी मराठा ही ओळख सांगितली नाही कारण त्यांना धोका होता.

त्यांनी राजस्थानातील रोड राजाचे सैनिक असल्याचे सांगत आपली जात रोड असल्याचे सांगितले.

मात्र, रोड समाजाला आपल्या पूर्वजांबद्दल किंवा आपल्या पूर्वाश्रमीच्या जीवनाबद्दल काहीच माहीत नाही.

इतिहासातही तशा नोंदी नाहीत.

३. मराठ्यांवर लावले होते बक्षीस:

पानिपताच्या इतिहासाच्या अनेक कथा, दंतकथा आणि काही दस्ताऐवजही आहेत. त्यानुसार २३० गावांत हा समाज विखुरला आहे. हे सगळे ५०० मराठ सैनिकांचे वंशज आहेत.

अब्दालीने मराठ्यांचा पराभव केल्यानंतर हे सगळे विखुरले होते.

त्यावेळी अफगान सैनिकांना आदेश दिला होता की एक मराठा मारून त्याचे मुंडके आणा आणि एक सोन्याचा शिक्का मिळवा.'

त्यामुळे ते अनेक दिवस जंगलात लपून बसले होते, असेही म्हटले जाते.

४. मराठमोळ्या प्रथा, परंपरा:

रोड मराठा समाजाला आपल्या पूर्वजांबद्दल काहीच माहीत नाही, परंतु त्यांच्या प्रथा परंपरा या महाराष्ट्राशी मिळत्या जुळत्या होत्या.

मराठा ही ओळख पटवण्यास त्याच कारणीभूत ठरल्या. त्यांनी आपल्या प्रथा, परंपरा जपण्याचे प्रयत्न केले आहेत.

विविध धार्मिक समारंभातील विधी आणि बोलीतील काही मराठी शब्द आजही प्रचलित आहेत.

लग्नसमारंभात काही महाराष्ट्रातील विधी तेथे केले जातात.

५. भाषेत महाराष्ट्रातील शब्द :

रोड मराठा समाज हरियाणात राहत असल्याने त्यांची भाषा हिंदी आहे. त्यांचे जेवण हरियाणवी पद्धतीचे असले तरी सणसमारंभाला ते पुरणपोळी करतात.

हरियाणातील पद्धतीनुसार ते पगडी आणि कपडे परिधान करतात. मात्र, पगडीला 'पटका' किंवा 'फटका' म्हणतात.

आपल्याकडील 'कवाड,' 'लाडू' 'ससा' 'पाहुणा', परात, रामराम, गोधडी, कधी, थांब, थांबले, माहिती, दुपार, जातं असे अनेक शब्द त्यांच्या भाषेत आहेत.

म्हशीची धार काढण्याला 'धार काढणे' हा शब्दही बोली भाषेत आहे.

शिवाय आपल्याकडे जसे शिंकल्यानंतर देवाचे नाव किंवा आई गं असं म्हणतो तसे ते 'छत्रपती की जय' असे म्हणतात.

येथील दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत.

६. अनेक ठिकाणी मूळ शोधण्याचा प्रयत्न :

रोड मराठ्यांना आपल्या इतिहासाबद्दल आणि पूर्वजांबद्दल काहीच माहीत नव्हते. त्यांनी जाट, राजपूत आणि उत्तर भारतातील लढावू समाजांत आपले कूळ शोधण्याचा प्रयत्न केला.

मात्र, त्यांना ते सापडले नाही. रोड मराठा समाजातील आयएएस अधिकारी विरेंद्र वर्मा यांनी याचे संशोधन केले.

कोल्हापूर येथील डॉ. वसंतराव मोरे यांनीही याबाबत संशोधन करून 'रोड मराठों का इतिहास' हे पुस्तक लिहिले आहे. या संशोधनातून हरियाणातील रोड समाज हा मराठा समाजच आहे हे सिद्ध केले आहे.

७. आठ लाखांवर लोकसंख्या:

अंदाजे २५० सैनिक कुटुंबं कर्नाल परिसरात वसली आणि त्यांचा वंशवृक्ष वाढला. मात्र, जशा पिढ्या गेल्या तशी त्यांची ओळख पुसून गेली.

रोड समाज अशीच त्यांची ओळख होती. हातात तलवार असल्याने त्यांना गावांच्या संरक्षणाची जबाबदारी मिळाली.

पुढे शेती हा व्यवसाय स्वीकारला. आजही या समाजाकडे हरियाणातील १९ टक्के जमिनी आहेत.

व्यापार आणि शेती हे उत्पन्नाचे स्रोत आहेत. पानिपत, सोनिपत, करनाल, कैथल, रोहतक या जिल्ह्यांमध्ये रोड हा समाज मोठ्या प्रमाणात आहे.

या समाजाची लोकसंख्या जवळपास आठ लाखांवर असल्याचे बोलले जाते.

८. अनेक मराठी आडनावे:

नीरज चोपडा (Neeraj Chopra) याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर नीरज चोपडा (Neeraj Chopra) या आडवानावर अनेक चर्चा झडल्या.

डॉ. वसंतराव मोरे यांच्या पुस्तकात आडनावांबाबत ऊहापोह केला आहे. नावे हरियानवी पद्धतीची असली तरी आडनावे मात्र मराठी पद्धतीची आहेत.

पवार, पाटील, चव्हाण, भोसले, सावंत, चोपडे (Neeraj Chopra), घोले, दाभाडे, बोडले, जोंधळे आणि शेलार अशी आडनावं आहेत.

९. पानिपत नव्हे तर नंतर गेलेले सैनिक :

सध्याचा रोड मराठा समाज हा पानिपतच्या युद्धातील सैनिकांचे वंशज नसून ते नंतर मराठा सरदारांबरोबर गेलेले सैनिक आहेत असाही एक सिद्धांत मांडला जातो.

पानिपतच्या युद्धात मराठ्यांची हार झाली तरी तेथे मराठ्यांनी आपले स्थान पक्के केले.

शिंदे, होळकर या सेनापतींनी दिल्लीवर अनेक चढाया केल्या. त्या चढायांमध्ये सहभागी झालेले सैनिक तिथेच स्थायिक झाले,असेही म्हटले जाते.

मात्र, हे सैनिक नंतर स्थायिक झाले असते तर त्यांनी ओळख लपविली नसती, असेही म्हटले जाते.

१०. नातेसंबंध आपसात:

रोड मराठा समाजातील नातेसंबंध कसे आहेत याबातही उत्सुकता आहे. रोड मराठे लग्नसंबंध आपसात ठरतात.

मुळात रोड मराठा समाज हा अठरा पगड जातींनी तयार झालेला असला तरी तो मराठा म्हणूनच ओळखला जातो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news