धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा; कृत्रिम पावसाचीही मागणी

धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा; कृत्रिम पावसाचीही मागणी
Published on
Updated on

पुरेसा पाऊस नसल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत धुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांची काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ आणि शेतकऱ्यांनी भेट घेतली. यावेळी धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांसमोर व्यथा मांडण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार कुणाल पाटील यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती सांगितली. आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, राज्यात अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातलेला असूनही धुळे जिल्हयात मात्र तीन चार आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. भूईतून निघालेली पिके कोमजू लागली आहेत. जिराईत शेतीकडे पाहिले तर जीव कासावीस होतो.

बागायतदार शेतकरी देखील चिंतेत

बागायतदार शेतकरीसुध्दा विहिरीतील पाणी तळाला गेल्याने चिंतेत आहे. जिल्हयात अद्याप एकदाही मसुळधार पाऊस पडला नसल्यामुळे नद्या, नाले, ओढे कोरडेठाक आहेत. परिणामी विहिरींचा उद्भव आटत आला आहे. त्यामुळे जिराईत आणि बागाईत शेती करणारे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.

जिल्हयातील मध्यम, लघु आणि इतर पाटबंधारे प्रकल्पात पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. तीन आठवड्यापासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. आभाळात ढगांची गर्दी होत आहे पण पाऊस मात्र पडत नाही. गेल्या आठवड्यात कडक ऊन पडल्याने पिके अधिक प्रमाणात कोमजू लागली आहेत. पिकांची अवस्था नाजूक झाली आहे.

पीकं रोगराईचे बळी

जिराईत आणि बागाईत शेतात जी काही पिके उभी आहेत ती पुरेसा पाऊस नसल्याने रोगराईला सामोरे जात आहेत. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वच चातकसारखी पावसाची वाट पाहत आहेत. एकीकडे शेतीचे हे संकट निर्माण झाले असतांना काही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकर्‍यांचे सरकार असल्याचे गेल्या दोन वर्षात स्पष्ट झाले आहे. राज्यातील शेतकर्‍यांना दिलास देण्यासाठी, आर्थिक आधार देण्यासाठी या सरकारने कधीच मागेपुढे पाहिले नाही. आपण महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधी म्हणून धुळे जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती उद्भवली असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी आणि धुळे जिल्हयात दुष्काळ जाहीर करण्यात यावा.

कृत्रिम पावसासाठी प्रयत्न करावेत

या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक सर्वांनाच योजनेचा लाभ द्यावा, जिल्हयात कृत्रिम पाऊस पाडण्याचा बाबतीत शासनस्तरावर आपण संवाद साधून मार्ग काढावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजीराव पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल, साहेबराव खैरनार डॉ.दत्ता परदेशी, पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके यांच्यासह शेतकरी व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाला अहवाल पाठवून धुळे जिल्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : सरु आजीला शिव्या कुणी शिकवल्या? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news